पारनेर | नगर सह्याद्री
श्रीक्षेत्र पोखरी येथील हभप. श्री रंगदास स्वामी महाराजांचा पालखी सोहळा दि.12 जुलै रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तब्बल 25 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्याचा यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने वारकरी व भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थ तसेच श्री रंगदास स्वामी महाराज प्रसादिक भजनी मंडळाच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. भक्ती, शिस्त आणि सेवाभावी परंपरा जपत हा पालखी सोहळा दरवष मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. सोहळ्यात दररोज पहाटे काकड आरती, हरिपाठ, अखंड भजन, प्रवचन, कीर्तन व जागर यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.रौप्यमहोत्सवानिमित्त यंदा संपूर्ण वारीदरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी संस्थानच्या वतीने शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय तपासणी तसेच वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र पोखरी येथून निघालेली पालखी कर्जुले हरेश्वर, हंगा, सुरेगाव, श्रीगोंदा, देऊळगाव, कोकणगाव, पिंपळवाडी, रवखाळेवस्ती, कर्जत, कोकरेवस्ती, उमरड, परांडे मळा, कंदर, ज्योतिबा मंदिर, नाळेवस्ती, टेंभुण, भोसे, सुगाव मार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे.










