अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
आपल्या कथित अपहरण प्रकरणामागे खासदार निलेश लंके यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत करण्यात यावा, अशी मागणी किशोर महादेव परभणे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली.
परभणे यांनी सांगितले की, 1 मे 2026 रोजी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दिल्यानंतर 4 मे रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 5 मे रोजी काळेवाडी येथे त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि 22 मे रोजी त्यांना अटक करण्यात आली.
काळेवाडी येथील महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीतील अनेक बाबी ऑडिओ रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होत असल्याचा दावा परभणे यांनी केला. संबंधित महिलेने काही प्रभावशाली व्यक्तींची नावे घेतल्याचे तसेच कामाच्या बदल्यात काही मागण्या करण्यात आल्याचे या रेकॉर्डिंगमध्ये असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या सर्व बाबींची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तपास प्रक्रियेबाबतही परभणे यांनी गंभीर आक्षेप घेतले. अपहरण प्रकरणातील महत्त्वाच्या सीसीटीव्ही फुटेजकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, काही प्रभावशाली व्यक्तींच्या दबावामुळे तपासाची दिशा बदलल्याचा आरोप त्यांनी केला. अपहरणाच्या काळातील घटनाक्रम आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी परभणे यांनी दावा केला की, काळेवाडी येथील महिलेच्या फिर्यादीत काही संबंधित व्यक्तींची नावे स्पष्टपणे नमूद आहेत आणि त्यासंदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे. तसेच राणी लंके यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी संबंधित व्यक्तींचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच इतर तांत्रिक पुराव्यांची तपास यंत्रणांनी सखोल तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींचे सीडीआर, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध ऑडिओ रेकॉर्डिंगची फॉरेन्सिक तपासणी करून सत्य समोर आणावे, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत परभणे यांनी आपल्या ताब्यात ऑडिओ रेकॉर्डिंग, छायाचित्रे आणि इतर काही पुरावे असल्याचा दावा केला. या सर्व पुराव्यांची निष्पक्ष पडताळणी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि संपूर्ण प्रकरणाचा सीबीआय किंवा एसआयटीमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.










