हाय रिस्क माता शोधा, बालमृत्यू रोखा ः उपसंचालक डॉ. कपिल आहेर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
अहिल्यानगर आपला दवाखाना हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाने गांभीर्याने पार पाडणे आवश्यक आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये दररोज किमान 100 ते 150 रुग्णांची ओपीडी होणे गरजेचे असून नागरिकांना मोफत औषधोपचार सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जाऊन आरोग्य सुविधांबाबत जागृती करण्याची आवश्यकता आहेें. दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मी स्वतः येऊन पाहणी करणार, असे स्पष्ट करत आरोग्य सेवेत हलगजपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे प्रतिपादन नाशिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. दिलीप बागल यांच्यासह डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
जन्मलेल्या प्रत्येक बालकाच्या लसीकरणाबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. कपिल आहेर म्हणाले. आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बालकांना तातडीने झिरो डोस देण्यात यावा, जेणेकरून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही. तसेच आरोग्य केंद्रामार्फत हाय रिस्क मातांचा शोध घेऊन त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून योग्य उपचार करण्यात यावेत. बालक जन्मल्यानंतर घरी गेल्यावर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत आशा सेविकांनी घरोघरी जाऊन माहिती द्यावी. आशा सेविका या आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा असून त्यांच्यामार्फत आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात. जन्मलेल्या बालकांची योग्य पद्धतीने का जी घेतल्यास बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. आहेर पुढे म्हणाले की, मी आता दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्वतः येथे येऊन आढावा बैठक घेणार आहे. फक्त बैठक न घेता प्रत्यक्ष आरोग्य केंद्रांची पाहणी करून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेणार आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर म्हणाले की, नाशिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत विविध आरोग्यविषयक उपक्रमांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सुविधांची माहिती दिली. शासनाच्या पोर्टलवर सर्व माहिती नियमितपणे अपडेट केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी दिलेल्या सूचनांनुसार आरोग्य विभागाच्या कामकाजात अधिक सुधारणा करून नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.










