लाभधारक शेतकऱ्यांत संताप!
पाथर्डी | नगर सह्याद्री
तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नुकतेच या कामास या भागातील कार्यकर्त्यांनी भेट देऊन पहाणी केली. दीड वर्षात अवघे 30 टक्के काम झाले.
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागास वरदान ठरलेल्या वांबोरी चारी योजनेतून या भागातील डोंगराच्या कडेला असणारी 12 गावे वंचित राहिली होती. या गावांनी तब्बल 17 वर्षे संघर्ष केल्याने अखेर न्याय मिळाला. या गावासाठी टप्पा दोन योजनेस मंजुरी देण्यात आली. या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीस दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. दीड वर्षे होत आले मात्र या योजनेचे काम फक्त 30 टक्केच झाले आहे. मुळा धरण ते साठवण टाकीपर्यतचे काम जलद करण्यात आले. मात्र, साठवण टाकी ते वितरण तलाव हे काम संथगतीने चालू आहे.
आतापर्यंत चार ठिकाणी तरी हायड्रोलिक टेस्ट होणे अपेक्षित होते. पण आतापर्यंत फक्त एकाच ठिकाणी ही टेस्ट घेण्यात आली. संबंधित ठेकेदार, मध्यम प्रकल्पाचे अधिकारी यास जबाबदार आहेत. आता पावसाळा सुरू झाला आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यावर काम करता येणार नाही. मग या योजनेचे काम दोन वर्षात कसे पूर्ण होणार? यावर्षी दुष्काळ पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वेळोवेळी सांगितला आहे. योजना पूर्ण झाली असतील तर उन्हाळ्यातच अर्ध्या भागाला पाणी मिळाले असते. पाहणीच्या वेळी माजी सभापती संभाजीराव पालवे, सरपंच अंबादास डमाळे, भानुदास डमाळे, रामनाथ शिरसाट, वासुदेव पालवे, मारुती शिरसाटसह अनेक मान्यवर हजर होते. या योजनेचे काम लवकरच पुर्ण करण्यात यावे, यासाठी या भागातील एक शिष्टमंडळ पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे.
अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
वांबोरी चारी टप्पा दोन ही योजना या भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या कामासंदर्भात संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत.
– संभाजीराव पालवे, माजी सभापती










