बनावट युटीआरद्वारे रक्कम लांबविली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील शिल्पा गार्डन परिसरातील महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्राायव्हेट लिमिटेड शोरूमची तब्बल 41 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शुभम संजय शिंदे (वय 27, रा. सदर बाजार, भिंगार, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे हे सदर शोरूममध्ये लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पवन गुरुनाथ पांडव (रा. निर्मल नगर, सावेडी, अहिल्यानगर) आणि संतोष त्रिंबक दळवी (रा. भगवान निवास, निर्मल नगर, सावेडी, अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा फसवणुकीचा प्रकार 3 जानेवारी 2026 ते 7 मे 2026 या कालावधीत शोरूममध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी आपसात संगणमत करून बँकेचे बनावट युटीआर क्रमांक तयार केले. हे बनावट क्रमांक त्यांनी फिर्यादी शुभम शिंदे आणि शोरूमचे मुख्य व्यवस्थापक सचिन चांदने यांच्या भ्रमणध्वनीवरील संदेश प्रणालीवर पाठवले. हे बनावट क्रमांक खरे असल्याचे भासवत आरोपींनी शोरूमची आणि प्रशासनाची दिशाभूल केली. याद्वारे शोरूमचे तब्बल 41 लाख रुपये अडकवून आर्थिक फसवणूक करण्यात आली.या प्रकरणाचा प्राथमिक अर्ज चौकशीसाठी प्रलंबित होता. अखेर चौकशी पूर्ण झाल्यानंतर 1 जून 2026 रोजी मध्यरात्री या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
जेऊरमध्ये नाचण्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला
सहा जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तालुक्यातील बायजाबाई जेऊर परिसरात नाचण्याच्या कार्यक्रमात धक्का लागल्यावरून झालेल्या वादात एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेऊर परिसरात नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू असताना सुमीत संजय कोल्हे आणि आरोपींमध्ये किरकोळ वाद झाला. नाचताना धक्का लागला, नीट नाचा, असे सुमीत यांनी आरोपींना म्हटले. या गोष्टीचा तीव्र राग आल्याने आरोपी रोहन कैलास पाटोळे याने सुमीत यांच्यावर हातातील कोयत्याने थेट वार केला. हा वार अडवण्यासाठी सुमीत यांनी डावा हात मध्ये केला असता, कोयता त्यांच्या हाताला लागून ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर अमित दिलीप पाटोळे याने सुमीत यांच्या डाव्या खांद्यावर कोयत्याने दुसरा वार केला. या हल्ल्यामुळे सुमीत खाली कोसळले. सुमीत खाली पडल्यानंतर आरोपी रोहन पाटोळे, शुभम पाटोळे, अमित पाटोळे, अक्षय पाटोळे, दाद्या पाटोळे आणि कैलास पोटोळे यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुमीत कोल्हे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सहाही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










