शेती मशागतीची कामे ठप्प
पारनेर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे ठप्प होत असल्याने शेतकऱ्यांना तत्काळ पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच गृह व पुरवठा शाखेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्यासह राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण बेलकर, जिल्हाप्रमुख सुभाष करंजुले, तालुका सचिव अन्सार पटेल, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वाळुंज, राजेंद्र कर्डिले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या जिल्ह्यात डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर होत आहे. ट्रॅक्टर, पंप, शेती अवजारे व इतर यंत्रसामग्रीसाठी डिझेल अत्यावश्यक असताना अनेक पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. काही ठिकाणी मर्यादित प्रमाणात डिझेल दिले जात असून ड्रममध्ये डिझेल देण्यासही नकार दिला जात आहे.याशिवाय ट्रॅक्टरसाठी डिझेल घेताना सातबारा उतारा किंवा ट्रॅक्टरचे आरसी बुक मागितले जात असल्याने शेतकऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नांगरणी, पेरणी, फवारणी, मशागत यांसारखी महत्त्वाची शेतीकामे वेळेत होत नसून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
आधीच नैसर्गिक संकटे, अवकाळी पाऊस आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत असताना डिझेल टंचाईमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सूचना द्याव्यात, कॅनमध्ये डिझेल देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच डिझेल देताना सातबारा किंवा आरसी बुकची सक्ती करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना डिझेलचा पुरवठा सुरळीत न झाल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.










