- जाहिरात -spot_img
breaking news

विनापरवाना बॅनर्स लावणे भोवले; रस्ता, पैसे वादातून राडा, कुठे काय घडलं..

परस्परविरोधी गुन्हे दाखल | 14 जणांवर गुन्हे
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील बुरुडगाव शिवारात सामायिक रस्त्याच्या कारणावरून भाऊबंधांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरुडगाव येथील ऋषिकेश वसंत मोकाटे आणि आरोपी हे एकमेकांचे भाऊबंध आहेत. त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सामायिक रस्त्याच्या जागेवरून वाद सुरू होता. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ऋषिकेश मोकाटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी सामायिक रस्त्यावर आलेल्या काट्या तोडण्यास सुरुवात केली. याचाच राग मनात धरून आरोपी रवी बाळासाहेब गोकाटे, किरण बाळासाहेब गोकाटे, अंकुश बाळासाहेब मोकाटे, दिलीप पंढरीनाथ मोकाटे, लघु बाळासाहेब गोकाटे, बाळासाहेब पंढरीनाथ गोकाटे आणि किशोर पंढरीनाथ मोकाटे यांनी हातातील लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी ऋषिकेश आणि त्यांच्या सोबत असलेल्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्‌‍यात ऋषिकेश मोकाटे, मोहन रंगनाथ मोकाटे आणि शशिकांत रंगनाथ मोकाटे हे तिघे जण गंभीर जखमी झाले. आरोपींनी त्यांना अलील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऋषिकेश मोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या फिर्याद किरण बाळासाहेब मोकाटे यांनी दिली आहे. आम्हाला आमच्या शेताकडे रस्त्याने का जावून देत नाही. त्यावर फिर्यादी म्हणाले की कोर्टात केस चालू आहे. निकाल लागल्यानंतर बघू असे म्हटल्याचा राग आल्याने ऋषीकेश बाळासाहेब मोकाटे, वसंत रंगनाथ मोकाटे, शशिकांत रंगनाथ मोकाटे, मोहन रंगनाथ मोकाटे, चंद्रकांत रंगनाथ मोकाटे, महेश शशिकांत मोकाटे, रमेश शशिकांत मोकाटे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच आई व चुलती यांना शिवीगाळ करुन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल; 58 अधिकाऱ्यांच्या बदल्या

विनापरवाना बॅनर्स लावणे भोवले
शहरातील कोचिंग क्लासेस, शाळांवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील पाईपलाईन रोड परिसरामध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे फ्लेक्स, बोर्ड आणि बॅनर्स लावून शहर विद्रूप करणाऱ्या विविध कोचिंग क्लासेस आणि शाळांच्या चालकांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही धडक कारवाई केली आहे.

प्रभाग समिती 1 चे प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 29 जून रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाच्या पथकाने पाईपलाईन रोडवरील विविध चौकांमध्ये तपासणी केली होती. या कारवाईत विनापरवाना लावलेले अनेक फ्लेक्स बोर्ड जप्त करण्यात आले होते. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेन्वये शासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकाने ही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या प्रमुखांच्या आदेशानंतर, संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 च्या कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गांगर्डे करत आहेत.

या संस्थांवर कारवाई
साई समर्थ कोचिंग क्लासेस (श्रीराम चौक, पाईपलाईन रोड) 2 बोर्ड, किड्स जी. प्री. स्कूल (श्रीराम चौक, पाईपलाईन रोड) 3 बोर्ड, हायटेक कॉम्प्युटर एज्युकेशन (वाणी हाईट्स, श्रीराम चौक) 5 बोर्ड, संदीपाणी अकॅडमी (एकविरा चौकाजवळ, पाईपलाईन रोड) 3 बोर्ड, दरेकर सायन्स अकॅडमी (सोनानगर चौक, एकविरा चौकाजवळ) 3 बोर्ड, श्री असोसिएट्स (डौले हॉस्पिटलजवळ, भिस्तबाग चौक) 2 बॅनर्स, चित्रकुट गुरुकुल (भिस्तबाग चौकजवळ, पाईपलाईन रोड) 2 बोर्ड व ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (संघर्ष चौकाजवळ, पाईपलाईन रोड) 4 बॅनर्स जप्त करण्यात आले आहे.

पहिल्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील नालेगावमधील अमरधाम परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना दुर्दैवी घटना घडली आहे. येथे काम करत असताना एका मजुराचा पहिल्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळून मृत्यू झाला. कैलास किसन जाधव (वय 46, रा. निंबोडी, ता. अहिल्यानगर) असे मृत पावलेल्या मजुराचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा :  शॉर्ट सर्किटमुळे आग, एक एकर गहू जळाला...; नगरमधील घटना

कैलास जाधव हे नालेगाव अमरधाम येथील इमारतीच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. दि. 7 जुलै रोजी दुपारी काम करत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पहिल्या मजल्यावरून थेट सिमेंटच्या जमिनीवर पडले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पैशांच्या वादातून बेकरीत राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत पिता-पुत्राला केले जखमी, कोतवालीत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील आनंदनगर स्टेशन रोडवरील मल्हार चौक परिसरात पैशांच्या व्यवहाराच्या वादातून एका बेकरीत घुसून पिता-पुत्राला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बेकरी चालक विजय रमेश सुरसे आणि त्यांचा मुलगा यश सुरसे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी सकाळी साडेकरा वाजेच्या सुमारास स्वराज हॉटेल शेजारी असलेल्या बेकरीमध्ये विजय सुरसे आणि त्यांचा मुलगा काम करत होते. दरम्यान, जुन्या व्यवहाराच्या कारणावरून आरोपी महेश वसंत सुरसे (रा. सातभाई मळा, दिल्लीगेट) हा बेकरीमध्ये आला. त्याने पैशांच्या व्यवहाराबाबत विचारणा केली असता, फिर्यादी विजय सुरसे यांनी एका महिन्याच्या आत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, याचा राग येऊन आरोपी महेश याने काहीही न ऐकता सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने विजय यांच्या डाव्या पायावर, खांद्यावर आणि कंबरेवर जोरात प्रहार केले.
​आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा यश सुरसे मध्ये पडला असता, आरोपीने त्यालाही सोडले नाही. आरोपी महेश याने यशच्या डाव्या पायावर लाकडी दांडक्याने जोरात मारून त्याला गंभीर जखमी केले. या मारहाणीनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमधील जबाबावरून कोतवाली पोलिसांनी आरोपी महेश सुरसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद वाघ करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  जामखेड शेतकरी भवनासाठी ३२ लाखांचा पहिला हप्ता वितरित; सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ