- जाहिरात -spot_img
breaking news

शेतकऱ्यांची चिंता वाढली; खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा, कशी आहे परिस्थिती…

जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांची वाढली धास्ती | 22 हजार 414 मेट्रिक टन खतांची मागणी, मंजूर आवंटन केवळ 14 हजार 307 मेट्रिक टन
जामखेड | नगर सह्याद्री

मान्सूनचे आगमन, पेरणीची लगबग आणि शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचा खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच जामखेड तालुक्यात रसायनिक खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या खतांच्या मागणीच्या तुलनेत मंजूर आवंटन मोठ्या प्रमाणात कमी असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीपूर्व काळातच खतांची कमतरता जाणवू लागल्याने आगामी काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सन 2026-27 च्या खरीप हंगामासाठी जामखेड तालुक्यात विविध प्रकारच्या खतांची एकूण 22 हजार 414 मेट्रिक टन मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र राज्यस्तरावरून तालुक्याला केवळ 14 हजार 307 मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. म्हणजेच मागणीच्या तुलनेत सुमारे 8 हजार मेट्रिक टन खतांची तूट राहणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

खतांच्या प्रकारानुसार पाहिले असता, युरियाची 9 हजार 28 मेट्रिक टन मागणी असताना फक्त 5 हजार 759 मेट्रिक टन आवंटन मिळाले आहे. डीएपी खतासाठी 2 हजार 311 मेट्रिक टन मागणीच्या तुलनेत 1 हजार 292 मेट्रिक टन, तर एमओपी खतासाठी 1 हजार 375 मेट्रिक टन मागणी असताना केवळ 356 मेट्रिक टन आवंटन मिळाले आहे. विशेष म्हणजे, एसएसपी खताची 2 हजार 884 मेट्रिक टन मागणी असताना फक्त 213 मेट्रिक टन आवंटन मंजूर झाल्याने या खताचा सर्वाधिक तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. एनपीके खतासाठी 6 हजार 861 मेट्रिक टन मागणी असून त्यापैकी 6 हजार 687 मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे.

खतांचा साठा आणि पुरवठ्याची स्थिती पाहिली असता, 24 एप्रिलअखेर तालुक्यात युरियाचा 776 मेट्रिक टन, डीएपीचा 233 मेट्रिक टन, एमओपीचा 53 मेट्रिक टन, एसएसपीचा 628 मेट्रिक टन आणि एनपीकेचा 2 हजार 106 मेट्रिक टन साठा उपलब्ध होता. त्यानंतर 22 मेपर्यंत झालेल्या नव्या पुरवठ्यात युरियाचा 570 मेट्रिक टन, डीएपीचा 186 मेट्रिक टन, एमओपीचा 35 मेट्रिक टन, एसएसपीचा 64 मेट्रिक टन आणि एनपीकेचा 2 हजार 204 मेट्रिक टन पुरवठा करण्यात आला आहे. मात्र हा पुरवठा वाढत्या मागणीच्या तुलनेत अपुरा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.जामखेड तालुक्यात सोयाबीन, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद तसेच विविध नगदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या पिकांच्या उत्पादनक्षमतेसाठी पेरणीपूर्व आणि सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत युरिया, डीएपी व एनपीके खतांची आवश्यकता असते. त्यामुळे खतांचा पुरवठा वेळेवर न झाल्यास पेरणीचे नियोजन विस्कळीत होण्याबरोबरच उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो.गत काही वर्षांत खतांच्या तुटवड्याच्या काळात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या होत्या. काही ठिकाणी खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. त्यामुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरजेपेक्षा जास्त खतांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच अतिरिक्त आवंटन मिळविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  जामखेड शहरातील रस्त्याचा श्वास मोकळा... कोणी केली कारवाई
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ