प्रवास महागला | युद्धाची सर्वसामान्य प्रवाशांनाही बसतेय झळ | अनेक रिक्षा उभ्या
सुनिल चोभे | नगर सह्याद्री
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा परिणाम आता थेट सर्वसामान्य नागरिकांवर दिसू लागला आहे. शहरात एलपीजी गॅस सहज उपलब्ध होत नसल्याने रिक्षाचालक अडचणीत आले असून, त्याचा फटका प्रवाशांनाही बसत आहे. अनेक ठिकाणी रिक्षा भाड्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अहिल्यानगर शहरात सुमारे सात हजार रिक्षा आहेत. मात्र गॅसचा पुरवठा कमी झाल्याने अनेक रिक्षा रस्त्यावर धावण्याऐवजी स्टँडवरच उभ्या राहत आहेत. गॅस सहज मिळत नसल्यामुळे चालकांना तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत.
याशिवाय एलपीजी गॅसचा दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे रिक्षा चालक सांगत आहेत. चार दिवसांपूर्वी ४५ रुपयांत मिळणारा गॅस आता ८५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे खर्च वाढल्याने अनेक चालकांनी रिक्षाभाडे जवळपास दुप्पट केल्याचे चित्र शहरात आहे.
भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा रोजचा प्रवास महाग झाला आहे. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि बाजारहाटासाठी जाणार्या महिलांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
दरम्यान, गॅसटंचाई आणि वाढत्या दरामुळे रिक्षाचालक आणि नागरिक दोघेही त्रस्त झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गॅसचे भाव दुप्पट
अहिल्यानगरमध्ये सक्कर चौक, बोल्हेगाव फाटा आणि बसस्टँडशेजारी असलेल्या पंपावर गॅस मिळतो. परंतु शुक्रवारी सकाळी तीनही ठिकाणी गॅस मिळत नव्हता. तीन दिवसांपासून ४२ रुपये लीटर मिळणारा गॅस ८५ रुपये मिळत आहे. पेट्रोलवर रिक्षा अॅवरेज देत नाहीत. त्यामुळे भाडेही वाढले आहे. प्रशासनाने तातडीने गॅस उपलब्ध होईल यादृष्टीने कार्यवाही करावी.
– परसराम भागवत, रिक्षा चालक
एमआयडीसीसाठी ६० तर सावेडीपर्यंत मोजा ४० रुपये
गेल्या तीन दिवसांपासून रिक्षांना लागणार्या एलपीजी गॅससाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. तीन दिवसापूर्वी गॅस ४५ रुपये लीटर मिळत होता. आता ८५ रुपये द्यावे लागत आहेत. बसस्टँडपासून सावेडीपर्यंत जाण्यासाठी २० रुपये द्यावे लागत होते. आता ४० रुपये द्यावे लागत आहेत. एमआयडीसीला जाण्यासाठी ६० रुपये द्यावे लागत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलला जाण्यासाठी आता ३० रुपये पाईपलाईनला जाण्यासाठी ५० रुपये द्यावे लागत आहेत.
जिल्हाधिकार्यांना भेटणार, प्रशासनाने मार्ग काढावा ः घुले
युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रांत परिणाम दिसू लागले आहेत. शहरात सात हजार पेक्षा अधिक रिक्षा असून ते नागरिकांना सेवा देत आहेत. युद्धामुळे रिक्षांना लागणार्या एलपीजी गॅससाठी पेट्रोलपंपांवर रांगा लागत आहेत. अहिल्यानगर शहरातील नागरिकांना त्रास होऊ नये, रिक्षा चालकांना सहजरित्या गॅस उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करणे अपेक्षित आहे. गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना भेटणार असल्याची प्रतिक्रिया रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिली.
रिक्षा चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ
अहिल्यानगर शहरात सुमारे सात हजार रिक्षा असून याच रिक्षांवर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. इराण-इस्त्रायल-अमेरिका यांच्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारत देशातील तसेच अहिल्यानगरमधील सर्वसामान्य कुटुंबावर होत असल्याचे पहावयास मिळतेय. अहिल्यानगरमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून रिक्षांसाठी लागणार्या एलपीजी गॅसची टंचाई जाणवत होती. गॅस भरण्यासाठी पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परंतु शुक्रवारपासून शहरातील एलपीजी पंपांवर रिक्षांसाठी गॅस मिळत नव्हता. गॅसअभावी अनेक रिक्षा बंद होत्या. गॅस पुरवठा सुरळित न झाल्यास रिक्षा चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.










