मुंबई | नगर सह्याद्री
यंदा मान्सूनची एंट्री महाराष्ट्रात उशिराने झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने राज्यात धुमाकूळ घातला, मात्र गेले काही दिवस मान्सूनने दडी मारली आहे. यामुळे तापमानात वाढ होऊन नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. प्रशांत महासागरात घोंगावणाऱ्या वादळाचे आणि अल निनोचा हा परिणाम असल्याचे हवामान विभागाने म्हटले. सध्या वातावरणात ऊन सावलीचा लपंडाव चालू असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात अनेक भागांमध्ये पावसाला पोषक हवामान तयार होत असले तरी बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने कमाल तापमानाचा पारा 37 अंशपर्यंत पोहोचला असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.विशेषतः कोकणातील पालघर आणि रायगड जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये मात्र पावसाची उघडिप राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता असली तरी व्यापक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 जुलै नंतरच महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.










