- जाहिरात -spot_img
breaking news

तरुणावर दगडफेक, पिता-पुत्राला मारहाण, सोलर प्रकल्पातून तांब्याची वायर लंपास

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील विळद परिसरात असलेल्या एका नामांकित सोलर ऊर्जा प्रकल्पात चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत प्रकल्पातील हजार मीटर लांबीची तांब्याची महागडी केबल चोरून नेली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. सावेडी परिसरातील लक्ष्मीनगर येथे राहणारे आकाश बाळासाहेब गायकवाड हे खासगी नोकरी करतात. विळद येथील ’प्रिमीअर एनर्जी’ या सोलर ऊर्जा प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. १४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेपासून १६ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान, प्रकल्पाच्या आवारात कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी सुमारे ४५ हजार रुपये किमतीची काळ्या आणि लाल रंगाची, १००० मीटर लांबीची तांब्याची इलेट्रिक केबल लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस हवालदार मिसाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मिसाळ करत आहेत. शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक आणि उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शेतीच्या वादातून तरुणावर दगडफेक
अहिल्यानगर – तालुक्यातील वाळुंज येथे शेत रस्त्याच्या जुन्या वादातून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रदीप बाबासाहेब भवर हे आपल्या दुचाकीवरून शेताकडे जात होते. यावेळी शेत रस्त्याच्या कारणावरून आरोपी काशिनाथ रामचंद्र मोकाटे, आशा काशिनाथ मोकाटे आणि सार्थक काशिनाथ मोकाटे यांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी संगनमत करून प्रदीप यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपींनी हातातील दगडाने प्रदीप यांच्या डोयावर प्रहार केला. या झटापटीत एका महिला आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या पोटरीचा जोरात चावा घेऊन त्यांना जखमी केले. आज तुला सोडले आहे, तुझ्याकडे एक दिवस बघून घेऊ, अशी धमकी देत आरोपींनी तेथून पळ काढला. जखमी प्रदीप यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; नामांकित डॉक्टरांचाही सहभाग आला समोर

गव्हाच्या वादातून पिता- पुत्राला मारहाण
अहिल्यानगर: कौडगाव शिवारात गव्हाचे पीक झाकण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले असून, यामध्ये पिता-पुत्राला लाकडी दांडयाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात विकास लिपणे, संजय लिपणे, कैलास लिपणे आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संजय नाना गाढवे हे त्यांच्या शेतात गव्हाचे पीक गोळा करत असताना आरोपींनी तेथे येऊन ’हा गहू आमचा आहे’ असे म्हणत वाद उकरून काढला. फिर्यादीने विरोध दर्शवताच आरोपींनी प्रथम दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी घरी पळाले असता, आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी फिर्यादी संजय गाढवे आणि त्यांचा मुलगा स्वराज यांना लाकडी काठीने जबर मारहाण केली. ’पुन्हा गव्हाकडे आला तर पाहून घेऊ’ अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी घराच्या दरवाजाचेही नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भवार या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ