पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील ढवळपुरी येथे ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचा मूत प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व मंदिर लोकार्पण सोहळा सोमवार, दि. 29 जूनपासून अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरू झाला आहे.
बुधवार, दि. 1 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी गावातून श्रीरामांच्या मूतची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील अबालवृद्ध, महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीक्षेत्र दुर्गामातेच्या कुशीत वसलेल्या या पवित्र स्थळी सध्या विविध धार्मिक विधी, होम-हवन आणि यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी वास्तुशांती, ग्रामप्रदक्षिणा व विविध अधिवास विधी पार पडले. मंगळवार, दि. 30 जून रोजी सकाळी गणेश पूजन, नवग्रह स्थापना, रुद्र, विष्णू व रामयाग, होम-हवन आणि श्री दुर्गामातेची कावड यात्रा हे कार्यक्रम संपन्न झाले. मुख्य सोहळा आणि उपस्थिती बुधवार, दि. 1 जुलै रोजी सकाळी कलश प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम मूतची प्राणप्रतिष्ठा, महापूजन, कलश कुंभाभिषेक आणि महाआरती संपन्न होईल. या मुख्य दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळेत महंत रामगिरी महाराज (मठाधिपती, सराला बेट) यांच्या हस्ते कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा व कीर्तनसेवा पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर येथील पोखरणा उद्योग समूहाचे सुवालाल पोखरणा हे असून, जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
नव्याने उभारण्यात आलेल्या या श्रीराम मंदिरामुळे ढवळपुरीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार असून हा सोहळा गावाच्या इतिहासातील एक संस्मरणीय पर्व ठरेल.
सरपंच नंदाताई गावडे, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संदीप थोरात, उपाध्यक्ष संतोष बुचडे, सचिव रमेश केदारी, खजिनदार मच्छिंद्र व्यवहारे, विश्वस्त दत्तात्रय थोरात, पियुष कुंभकर्ण, संभाजी ढेकळे यांनी भाविकांना या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.










