मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. सोमवारपासून मान्सूनने आगेकूच करत संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला सुरुवात केली. गेले २ दिवस सुरु असलेली पावसाची रिमझिम सुखावणारी आहे. गेले कित्येक दिवस नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र पावसाच्या सरींनी नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान पहिल्याच पावसाचा फटका मुंबईकरांना बसला असून ठिकठिकाणी पाणी पोचल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकलसेवेवरती देखील परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगर, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मान्सून कुठपर्यंत पोहचला?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनने पालघर ते वर्धा या पट्ट्यापर्यंत मजल मारली असून कोकण, मराठवाड्यासह राज्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील उर्वरित भागांसह गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांतही मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे
मुंबईकरांना पावसाचा मोठा फटका!
मुंबईत मान्सूनच्या पहिल्याच दमदार सरींनी जनजीवन विस्कळीत केले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पहिल्याच पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला बसला. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल-ठाणे लोकल सेवा रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या मार्गावर अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. हार्बर मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या गाड्यांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब होत असून पश्चिम रेल्वेची वाहतूकही १० मिनिटे उशिराने सुरू आहे.
पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार; पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन, जवळपास 20 दिवस उलटले होते. मात्र राज्यात पावसाने हजेरी न लावल्याने चिंता वाढली होती. परंतु आता गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान 22 जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार आता मंगळवारपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 30 जूनपर्यंत मान्सूनची हीच स्थिती कायम असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान त्यानंतर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील मान्सूनबाबत आपला नवा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या 10 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे डख यांचा नवा अंदाज?
महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढत जाणार आहे, पुढील काही तासांमध्ये जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलाढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा असा सर्वत्र जोरदा पाऊस होणार आहे. 24 जून, 25 जून, 26 जून हे चार दिवस राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही, सगळ्या शेतकऱ्यांचा पेरण्या होणार आहेत. पूर्व विदर्भ, पश्चि विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी, खानदेश, मराठवाडा, या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावणार आहे, मुंबई, पुणे, घाटमाथा, नाशिक, रत्नागिरी ते रायगड या पट्ट्यामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हा पाऊस मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकरणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरण्यांना वेग येणार आहे.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार दिवस यलो अलर्ट, काय आहे हवामान विभागाचा इशारा…
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर मान्सूनने अहिल्यानगर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात दमदार हजेरी लावली. अहिल्यानगर, पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला असून दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात वारे पसरणार आहे. मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सुरू होता. पाऊस पडता झाल्याने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक समाधानी झाले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात सरासरी 11 मिलीमिटर पाऊस झाला.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्यानजरा आभाळाकडे लागल्या होत्या. अहिल्यानगर शहर व परिसरात मंगळवारी दुपारी काही काळ पाऊस कोसळला. पारनेर, पाथडत पाऊस सुरू होता. श्रीरामपूर शहर व तालुक्यातील बेलापूर, टाकळीभान, माळवाडगावसह विविध भागात सकाळपासूनच पाऊस सुरू होता. अधूनमधून होणारी रिपरिप यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच पाण्याअभावी आणि वाढत्या उष्म्याने भाजीपाला, फळबागा जळू लागल्या होत्या. त्यांनाही दिलासा मिळाला आहे.
देवळाली प्रवरा परिसरातील वादळी पावसामुळे लाख रस्ता भागात शेतकरी मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावर विजेच्या तारा तुटून पडल्याने विद्युत प्रवाह पसरला आणि त्यात आठ गायींचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोलेतही काही भागात पाऊस कोसळत होता. या पावसामुळे पेरणीची शक्यता वाढली आहे. तसेच पाऊस नसल्याने अनेक कृषी दुकानांमध्ये खते बियाणे पडून होते. त्याला आता मागणी वाढणार असून ही दुकाने शेतकऱ्यांनी फुलून जाणार आहेत.
आगामी सात ते आठ दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
चार दिवस यलो अलर्ट
मंगळवारपासून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होणाची शक्यता वर्तविली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.










