अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शेवगाव ते गेवराई मार्गावर असलेल्या ‘राजयोग’ हॉटेलवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धडक कारवाई केली. या कारवाईत नोकरीचे आमिष दाखवून परप्रांतीय तरुणींना वेश्या व्यवसायास भाग पाडणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी तीन पिडीत तरुणींची या विळख्यातून सुटका केली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध कृत्याची खात्री केली आणि धाड टाकली. यामध्ये हॉटेलचा मालक बाबासाहेब रामभाऊ अंधारे याच्यासह कृष्णा बापू झिरपे, प्रतिक मिलिंद रांधवने, अजिंक्य विठ्ठल अंधारे, अमोल पठाडे आणि अमर मारुती ढाकणे या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी हे तरुणींना परदेशातून नोकरीच्या नावाखाली बोलावून घेत होते. त्यानंतर त्यांना हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवून बळजबरीने देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हमीद शेख, स.फौ. शकील शेख, अर्चना काळे, छाया रांधवन आणि पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.










