- जाहिरात -spot_img
breaking news

​एकतर्फी प्रेमातून कुटुंबाला घरातच डांबले, कामगारानेच मालकाला लुटले, यात्रेच्या वादातून तुफान राडा, कुठे काय घडलं पहा

तरुणीने दिली चाकूने संपवण्याची धमकी
​अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
शहरातील केडगाव परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने एका कुटुंबाच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित मुलाशी लग्न लावून द्या, अन्यथा तुम्हांला किंवा स्वतःला चाकूने संपवून टाकेन, अशी धमकी देत या तरुणीने संपूर्ण कुटुंबाला घरातच अटकाव केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकामाता कॉलनी येथील पीडित महिलेचा मुलगा आणि संबंधित आरोपी तरुणी यांची ओळख महाविद्यालयात झाली होती. तेव्हापासून ही तरुणी त्या मुलावर एकतर्फी प्रेम करत होती. पीडित कुटुंबाने तिला वारंवार समजावून सांगूनही तिने आपला हट्ट सोडला नाही. यापूर्वीही तिने घरासमोर येऊन आत्महत्येची धमकी दिली होती, ज्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.
​मंगळवारी दुपारी पुन्हा या तरुणीने पीडितांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. “मला तुमच्या मुलासोबत लग्न करायचे आहे, मी इथून हलणार नाही,” असे म्हणत ती दरवाजापाशी ठाण मांडून बसली. कुटुंबाने तिला बाहेर जाण्यास सांगितले असता तिने बॅगेतील चाकूचा धाक दाखवला. “तुम्ही मला बाहेर काढले तर मी तुमच्यावर वार करीन किंवा स्वतःला इजा करून घेईन,” अशी धमकी देऊन तिने कुटुंबाला बराच वेळ घरातून बाहेर जाण्यास मज्जाव केला. काही वेळाने पुन्हा येण्याची धमकी देऊन ती निघून गेली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

शांतीनगर परिसरात रिक्षा लावण्यावरून वाद; लोखंडी पाईप आणि दगडाने चौघांना मारहाण
​अहिल्यानगर – शहरातील शांतीनगर फर्याबाग परिसरात रिक्षा लावण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण केल्याप्रकरी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बथुवेल प्रेमचंद खरात हे आपली रिक्षा घरासमोरील रस्त्याच्या पलीकडे लावत होते. यावेळी आरोपी लुईस शेळके, मंगेश शेळके, आदित्य शेळके आणि अजय शेळके यांनी ‘ही जागा आमची आहे, येथे रिक्षा लावू नको’ असे म्हणून वाद घातला. फिर्यादीने रिक्षा बाजूला घेतो असे सांगितले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी एका आरोपीने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार करून त्यांना जखमी केले.

​हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादीचा भाऊ, पत्नी आणि भावजय धावून आले असता, आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या झटापटीत फिर्यादीच्या भावाच्या हातापायावर दगडाने मारून जखमी करण्यात आले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या हाणामारीत फिर्यादीच्या पत्नीचे सोन्याचे दागिने गहाळ झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिंगार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस पथक करत आहे.

हे सुद्धा वाचा :  सुगंधित तंबाखूसह कार जप्त; आरोपी फरार

केडगावमध्ये घरफोडी; विश्वासू कामगारानेच लुटले अडीच लाखांचे दागिने व रोकड
​अहिल्यानगर – शहरातील केडगाव परिसरात एका घरामध्ये चोरीची मोठी घटना घडली असून, घरमालकाच्या विश्वासू कामगारानेच घरातील कपाटाचे लॉकर फोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ताराबाग कॉलनीतील रहिवासी आणि चित्रकला व्यवसायातील उद्योजक हरिश्चंद्र रामशिरोमण मौर्य यांच्याकडे आरोपी नयनकुमार भोलानाथ मौर्य हा तरुण कामाला होता. १३ एप्रिल रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेच्या दरम्यान, जेव्हा घरात कोणी नव्हते, तेव्हा आरोपीने संधी साधून कपाटातील लॉकरमधून ऐवज चोरला. यामध्ये १ लाख ६५ हजार रुपयांची रोकड, २२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि सोन्याचे डुल असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
​या घटनेनंतर हरिश्चंद्र मौर्य यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नयनकुमार मौर्य याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, चोरीसाठी वापरलेल्या दुचाकीचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.

घरगुती वादातून मेहुण्याकडून पतीला बेदम मारहाण; केडगाव परिसरातील घटना
​अहिल्यानगर: केडगाव येथील नेप्ती रोड परिसरातील पठारे मळा येथे घरगुती वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, पत्नीने बोलावलेल्या माहेरच्या मंडळींनी पतीला लाकडी दांडके आणि पाईपने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिद्र पठारे आणि त्यांच्या पत्नीमध्ये सकाळी घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून पत्नीने आपल्या माहेरच्या नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी मेहुणा देविदास जगताप हा आपल्या इतर पाच साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या कारमधून पठारे यांच्या घरी पोहचला.
​फिर्यादी अहिल्यानगर येथून घरी परतल्यानंतर आरोपींनी त्यांना गाठले. “तुमचा माज जास्त वाढला आहे” असे म्हणत मेहुण्याने अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, उपस्थित महिला नातेवाईकाने त्यांचे हात धरून ठेवले. याच दरम्यान आरोपी देविदासने प्लास्टिक पाईपने तर इतर साथीदारांनी पट्ट्याने आणि लाकडी दांडक्याने फिर्यादीला बेदम मारहाण केली.
​या झटापटीत फिर्यादीच्या हातातील सुमारे दीड तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या कोठेतरी गहाळ झाल्या आहेत. आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी देविदास जगताप, चिंगु जगताप, मनीषा जगताप आणि इतर तिघांविरुद्ध मारहाण व धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  ... तर घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही; महिन्याला एकाच सिलेंडर, पहा सविस्तर

जमिनीच्या वादातून अरणगाव शिवारात तरुणावर प्राणघातक हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: जमिनीच्या जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, अहिल्यानगर-खडकी रस्त्यावरील अरणगाव बायपास पुलाखाली एका तरुणावर विटांनी आणि लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला करण्यात आला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याण जिमदार काळे हे आपल्या दुचाकीवरून अहिल्यानगरहून खडकीच्या दिशेने जात होते. अरणगाव शिवारात पोहचले असता, आरोपी दीपक मुकेश भोसले याने पाठीमागून येत त्यांची दुचाकी अडवली. जुन्या जमिनीच्या कागदपत्रांच्या कारणावरून वाद उकरून काढत त्याने फिर्यादीला लाथ मारून खाली पाडले. “जमिनीचे कागदपत्र मला दे,” अशी मागणी करत दीपकने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तसेच जवळच पडलेल्या विटकरीने त्यांच्या हातावर, पाठीवर आणि बरगडीत गंभीर दुखापत केली.
​याच वेळी आरोपी नवनाथ मुकेश भोसले आणि शैलेश मुकेश भोसले त्या ठिकाणी आले. त्यांनीही फिर्यादीला बेदम मारहाण केली. आरोपी शैलेशने फिर्यादीच्या दुचाकीवर दगड टाकून वाहनाचे नुकसान केले आणि चावी फेकून दिली. “जर पोलिसांत तक्रार दिली तर तुला आणि तुझ्या लेकराबाळांना जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या झटापटीत फिर्यादीच्या बॅगेतील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. पोलिसांनी दीपक, नवनाथ आणि शैलेश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार काळे करत आहेत.

यात्रेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: नगर तालुक्यातील नेप्ती परिसरात यात्रेच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​पहिली घटना नेप्ती गावातील बिरोबा मंदिराजवळ घडली. फिर्यादी सार्थक रभाजी जपकर यांचा भाऊ शुभम याला आरोपी मारहाण करत होते. सार्थक हा मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, आरोपी संकेत अर्जुन मोरे याने त्याच्या पाठीवर दगड मारला. त्यानंतर मिलिंद अर्जुन मोरे, सिद्धांत अशोक जपकर आणि सुभाष मोरे यांनी लाकडी काठीने सार्थकला डोक्यात व पाठीवर बेदम मारहाण केली. आरोपींनी यावेळी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.
​मारहाणीची दुसरी घटना २७ एप्रिल रोजी घडली. जखमी फिर्यादीला रुग्णालयात नेल्याचा राग मनात धरून आरोपी संकेत मोरे आणि मिलिंद मोरे यांनी अभिजीत गोरे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबातील महिलांच्या अंगावर धावून जात त्यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सरोदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यानगर जिल्ह्यात चार दिवस पाऊस; हवामान खात्याने काय दिलाय इशारा पहा

पैशांच्या वादातून तरुणासह आईला मारहाण; जिवे मारण्याची धमकी
​अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी किल्ला परिसरात पैशांच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास फिर्यादी अनुराज लोखंडे याला आरोपी दत्तात्रय कासार याने पैशांच्या वादातून गाठले. यावेळी आरोपीने फिर्यादीचा हात जोरात पिरगळून त्याला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. केवळ मारहाणीवरच न थांबता आरोपीने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

​या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, आरोपी लक्ष्मण कासार आणि रंजना कासार यांनी फिर्यादीच्या घरात विनापरवाना प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरात असलेल्या फिर्यादीच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपमानित केले. “एक-दोन तासात तुमचा कार्यक्रमच करतो,” असे म्हणत संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
​या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये दत्तात्रय लक्ष्मण कासार, लक्ष्मण महादेव कासार आणि रंजना लक्ष्मण कासार यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींना अद्याप अटक झालेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

किराणा मालाच्या चोरीवरून वाद; तोफखाना परिसरात तरुणासह मित्राला जीवे मारण्याची धमकी
​अहिल्यानगर: शहर उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरात किराणा मालाच्या चोरीवरून झालेल्या वादाचे रूपांतर आता थेट जीवे मारण्याच्या धमकीत झाले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभय बाबासाहेब बुचुडे यांचा किराणा माल संशयित आरोपी सलीम शेख आणि त्याच्या मित्राने चोरला होता. हा माल फिर्यादीने त्यांच्याकडून परत मिळवला होता. मात्र, याच कारणाचा राग मनात धरून संशयिताने फिर्यादीला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. या घटनेत आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा करत, संशयिताने फिर्यादीला अत्यंत हीन भाषेत शिवीगाळ केली. केवळ एवढ्यावरच न थांबता, फिर्यादीसह त्यांचा मित्र अभिषेक आढाव यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

​या प्रकरणी अभय बुचुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी सलीम शेख, मुक्तार शेख, हसिना शेख आणि सलीमची आई (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व राहणार रांजणगाव मशीद, पारनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत. अहिल्यानगर पोलीस या प्रकरणातील संशयितांचा अधिक शोध घेत असून, परिसरात अशा प्रकारे धमकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ