श्रीरामपूर तालुक्यात लिंग गुणोत्तर घटलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही, सृष्टीचा आधारच मुलगी आहे. मुलीला नकार अर्थात उद्याच्या आईला आपण नकार देत आहोत, असे डॉ. सुधा कांकरिया यावेळी म्हणाल्या. आईला नाकारून सृष्टीच्या अस्तित्वाचा धोका निर्माण होत आहे. निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. खूप पाऊस पडला तर त्याला ओला दुष्काळ म्हणतात, पाऊसच नाही पडला तर त्याला कोरडा दुष्काळ म्हणतात, आणि चिमुकलीला गर्भातच मारून टाकणे म्हणजे हा मुका दुष्काळ होय, असे प्रतिपादन ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्यप्रवर्तक व पीसीपीएनडीटी स्टेट सुपरव्हिजरी बोर्ड महाराष्ट्र शासनाच्या सदस्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.
श्रीरामपूर तालुयातील १६ गावांतील लिंग गुणोत्तर ८०० पेक्षा खाली गेल्यामुळे खास या गावांतील ग्रामसमितीला सक्षम करण्याच्या हेतूने ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सुधा कांकरिया यांनी सखोल मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा दक्षता समितीचे अध्यक्ष मिलिंदकुमार वाघ होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे हे उपस्थित होते.
चिमुकलीला गर्भातच संपवण्याचा मुका दुष्काळ अत्यंत घातक असून तो जगाला नष्ट करू शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे. स्त्रीभ्रुणहत्याचा रावण संपवला पाहिजे. श्रीरामपूरमध्ये रावणाचा हा धुमाकूळ चिंतादायक आहे असे डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या. त्यांनी १६ गांवातील उपस्थित गांवकर्यांशी संवाद साधला, गांवातील अडचणी समजून घेतल्या. यातून बाहेर येण्यासाठी ११ सूत्री कृती कार्यक्रम स्लाईड शोच्या माध्यमातून स्पष्ट केला. येणार्या १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त होणार्या ग्रामसभेत स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घ्यावा तसेच लोकसहभागातून १० रुपयांची जादू लखोपती योजना राबवावी असे सांगितले. गर्भवती माता बरोबर आशाताई, नर्सेस यांनी मैत्री करून त्यांना आरोग्याच्या सर्व सुविधा पुरवीत असताना गर्भरक्षण व गर्भसंस्काराचे धडे द्यावेत. सोनोग्राफी मशीन ही शाप ठरणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच विवाह सोहळयात आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा या उपक्रमातून लोकचळवळ उभी करावी असे आवाहन डॉ. कांकरिया यांनी यावेळी केले. उपस्थित सर्वांना स्त्री जन्माच्या स्वागताची शपथ देण्यात आली.
या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. उपस्थितांपैकी फत्याबाद येथील सरपंच ज्ञानेश्वरी आठरे यांच्या सहित काहींनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त करतांना हा ११ कलमी कृती कार्यक्रम गावागांवातून राबविला जाईल याची खात्री दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे म्हणाले की आरोग्य विभागातील संपूर्ण टीम जोमाने कार्य करीत आहे. निश्चितच भविष्यात या १६ गांवातील लिंग गुणोत्तर नक्की वाढेल असा विश्वास वाटतो. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ म्हणाले की प्रत्येकाच्या मनात स्त्री जन्माचे स्वागताची एक पणती आज सुधाताईंनी प्रज्वलीत केली आहे. त्यामुळे नक्कीच स्त्रीभ्रूणहत्येचा हा अंधकार दूर होईल. त्यासाठी गांवसमितीत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. बालविवाह होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी असे ते म्हणाले. वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय श्रीरामपूर डॉ. दीपक परदेशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शेवटी डॉ. मोहन शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले. या कार्यशाळेमध्ये नरसाळी, बेलापूर खुर्द, एकलहरे, वांगी बुद्रुक, मांडवे, हरेगाव, माहवाडगांव, काडीत खु, माळेवाडी, गुजरवाडी, गळनिंब, फत्याबाद, काडीत बु, कन्हेगाव, मातापूर, पाचवाडी या १६ गांवातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आशाताई, अंगणवाडी ताई, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, ए एन एम उपस्थित होते.










