भंडारा / नगर सह्याद्री :
शहरातील एसटी डेपो परिसरात झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाण्याचं कॅन भरण्यासाठी गेलेल्या दुचाकीस्वारांना एसटी बसने चिरडल्याची ही दुर्दैवी घटना आहे.
मृतांमध्ये रोहित खेडकर (वय ३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर यांचा समावेश आहे. दोघेही भंडारा शहरातील चांदणी चौक परिसरातील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित खेडकर यांचा पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय होता. रिकामे कॅन भरण्यासाठी ते आपल्या मुलासह दुचाकीने एसटी डेपोमध्ये गेले होते. त्याचवेळी भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बाप-लेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. शासकीय रुग्णालयातही शेकडो नागरिक जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भंडारा शहर शोकाकुल झाले आहे.










