मुंबई / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेस पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर या चर्चेला अधिकच वेग आला आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यात आज नाना पटोले यांनीही विलीनीकरणाच्या प्रस्तावावर भाष्य केलेय.
राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच दिला होता. पण काही कारणांनी त्याला उशीर झाला. देश विकला जातोय, संविधान व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळी मतांचा विभाजन थांबविण्यासाठी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या सर्व पक्षांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची प्रक्रिया देशपातळीवर सुरू आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांना सोबत घ्यायचं सुरू असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विलीनीकरण हा प्रस्ताव आज नाही, खूप आधी देण्यात आला होता. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे यांनी याबाबतीत कामाला सुरुवात केली आहे. मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा एकमेव अजेंडा देशासमोर आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम करत आहे, असेही पटोले म्हणाले.
राऊत काय म्हणाले ?
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात एकत्र यावे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की संजय राऊत बरोबर बोलले आहेत, जे काँग्रेसमधून वेगळे झाले होते, त्यांनी आता एकत्र यायला हवं. राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचे नेते मानले पाहिजे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊत यांनी मांडलेले मत हे वैयक्तिक आहे. विलीनीकरणावर काय होतेय, हे भविष्य ठरवेल.










