- जाहिरात -spot_img

महाराष्ट्रात राजकीय ट्विस्ट; जयंत पाटील, तटकरे-पटेलांनंतर आता पार्थ पवार ‘वर्षा’वर

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत असून नव्या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये जवळीक वाढत असल्याच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी सुरू असलेल्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढवली आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील ‘वर्षा’वर उपस्थित होते. या सलग भेटींमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. या भेटीची माहिती पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना नव्हती, अशा बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताचे खंडन केले. मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगत पक्षामध्ये कोणताही संवादाचा अभाव नसल्याचा दावा त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात झालेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबतच्या चर्चांनाही पुन्हा वेग आला आहे.

दोन्ही बाजूंकडून या चर्चांचे खंडन करण्यात येत असले तरी सातत्याने होत असलेल्या भेटीगाठींमुळे तर्कांना खतपाणी मिळत आहे. राजकीय वर्तुळात शरद पवार गटातील काही आमदार सत्ताधारी महायुतीसोबत जाण्याच्या बाजूने असल्याची चर्चा आहे. माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अर्थमंत्री पदासाठी चाचपणी केली जात असल्याची चर्चा झडली आहे.

हे सुद्धा वाचा :  इराण–इस्त्रायल युद्धाचा थेट फटका शिर्डी-पंढरपूरला!

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता येत्या काही दिवसांत मोठे निर्णय किंवा नव्या राजकीय समीकरणांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर पार्थ पवार यांची ‘वर्षा’वरील भेटही त्याच घडामोडींचा भाग मानली जात असून राज्याच्या राजकारणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com