भुतवडा’च्या पाणीसाठ्याची पदाधिकाऱ्यांकडून पाहणी;
‘उजनी’मुळे भविष्यात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा
जामखेड | नगर सह्याद्री
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील पाणीसाठा व वितरण व्यवस्थेची जामखेड नगरपरिषदेच्या वतीने शनिवारी प्रत्यक्ष स्थळपहाणी करण्यात आली. वाढत्या उन्हामुळे शहरात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने तलावातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेत पुढील नियोजनास सुरुवात केली आहे. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत भुतवडा तलावात पुढील दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. लवकरच पावसाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शहरात सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असला तरी हा कालावधी कमी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील आहे.
भापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांतून उजनी धरणातून जामखेड शहरासाठी पाणी आणण्याच्या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहराची पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत झपाट्याने कमी होत असून उपलब्ध साठ्यावर ताण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने म्हणाले, दरवषप्रमाणे यंदाही शहराला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. मात्र भुतवडा तलावातील उपलब्ध साठ्यामुळे पुढील दोन महिने शहराचा पाणीपुरवठा सुरू ठेवणे शक्य होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या मासिक बैठकीत पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना राबविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार तलावातील पाण्याची पातळी, वितरण व्यवस्था व उपलब्ध स्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सध्या पाण्याची पातळी खालावल्याने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, पाणीपुरवठा समिती सभापती श्रीराम डोके, प्रा. कैलास माने, अमित चिंतामणी, नंदाताई होळकर, विकी घायतडक, प्रवीण चोरडिया, पवन राळेभात, हर्षद काळे, मुख्याधिकारी अजय साळवे, मनोज कुलकण, अर्जुन म्हेत्रे, आश्रू शेळके, सागर टकले, प्रविण होळकर यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.










