- जाहिरात -spot_img
breaking news

सुदर्शन कोतकरने गाजवले महाराष्ट्र केसरी कुस्तीचे मैदान; हरला पण, मने जिंकली…


भारताचा बलाढ्य मल्ल सिकंदर शेखला फोडला घाम!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

पुणे येथील वाघोलीमध्ये ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार पहावयास मिळाला. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा आणि अंगावर शहारे आणणारा थरार कुस्ती शौकिनांनी अनुभवला. हा थरार होता माती विभागातील एका महासंग्रामाचा आणि एका नवख्या पण जिद्दी मल्लाच्या उदयाचा. अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र सुदर्शन कोतकर याने या स्पर्धेत जो झंझावात निर्माण केला, तो कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जावा असाच आहे. पहिल्या फेरीपासून ते थेट सिकंदर शेखसारख्या बलाढ्य मल्लाशी भिडण्यापर्यंतचा सुदर्शनचा प्रवास म्हणजे एका धगधगत्या ज्वालामुखीचा स्फोटच होता.

स्पर्धेची सुरुवात झाली आणि आखाड्यात अहिल्यानगरच्या या वाघाची डरकाळी घुमली. पहिल्याच कुस्तीत सुदर्शनच्या समोर आव्हान होते ते पालघरच्या सुबोध पाटीलचे. सुदर्शनने पहिल्याच सेकंदापासून आक्रमक पवित्रा घेतला. सुबोधला सावरण्याची कोणतीही संधी न देता सुदर्शनने आपल्या मनगटाच्या ताकदीने आणि चपळाईने त्याला जेरीस आणले. कुस्तीच्या प्रत्येक डावावर सुदर्शनची मजबूत पकड होती. सुबोधने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण सुदर्शनच्या झंझावातापुढे तो टिकू शकला नाही. सुदर्शनने ५-० अशा फरकाने सुबोधला आसमान दाखविले. दुसरी कुस्ती वाशीमच्या राहुल सूळ सोबत होती. या अटीतटीच्या लढतीत सुदर्शनने राहुलला ४-१ असे पराभूत करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. तिसर्‍या कुस्तीत सुदर्शनची गाठ पडली ती नंदुरबारच्या शशिकांत जोमाळे याच्याशी. एकतर्फी झालेल्या या लढतीत सुदर्शनने शशिकांतला मातीची चव चाखायला लावली. ६-० असा निर्विवाद विजय मिळवत सुदर्शनने स्वतःला सिद्ध केले.

उपांत्य फेरीची चौथी कुस्तीमध्ये समोर होता भंडार्‍याचा तगडा मल्ल रामचंद्र कांबळे. रामचंद्रने सुदर्शनला चांगलीच झुंज दिली. सुदर्शनने आपल्या अनुभवाचा आणि बुद्धिमत्तेचा अचूक वापर करत रामचंद्रचे डाव उधळून लावले आणि आक्रमक चढाया करत ६-३ अशा फरकाने ही कुस्ती खिशात घातली.सलग चार कुस्त्या जिंकून सुदर्शन आता अंतिम टप्प्यात पोहोचला होता. त्याच्या समोर होते कुस्तीच्या मैदानातले एक महाकाय आव्हान. सिकंदर शेख सुदर्शनच्या समोर उभा होता. एका बाजूला कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा हुकमी एक्का सिकंदर आणि दुसर्‍या बाजूला अहिल्यानगरच्या मातीतला सुदर्शन. सुरुवातीची काही मिनिटे एकमेकांचा अंदाज घेण्यात, एकमेकांची ताकद आजमावण्यात गेली. सुदर्शनने अचूक टायमिंग साधत सिकंदरला खाली खेचले आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवत थेट २ गुण वसूल केले.

हे सुद्धा वाचा :  उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बेबनाव ...पारनेरमध्ये काय घडलं

पॅसिव्हिटीच्या नियमाचा फायदा आणि पट काढल्याचे २ गुण अशा एकूण ३ गुणांची भरघोस कमाई सुदर्शनने केली. सिकंदरने आपला हुकमी डाव टाकला. सुदर्शनच्या पकडीतून स्वतःला सोडवले, हात उडवून तो मागे गेला आणि चपळाईने सुदर्शनच्या पाठीवर जाऊन ताबा मिळवला. या एकाच डावात सिकंदरने दोन गुण वसूल केले आणि गुणफलक ३-३ असा बरोबरीत आणून ठेवला. घड्याळात केवळ १९ सेकंद उरले होते. काळजाचे ठोके वाढवणारे ते शेवटचे क्षण होते. सुदर्शन जिवाच्या आकांताने लढत होता. याच झटापटीत सिकंदरने आपल्या ताकदीचा वापर करत सुदर्शनला मागे रेटण्यास सुरुवात केली. सुदर्शन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता, पण सिकंदरच्या रेट्यापुढे त्याचे पाय आखाड्याच्या रेषेबाहेर गेले.

’स्टेप आऊट’! पंचांनी शिट्टी वाजवली आणि सिकंदरला आणखी १ गुण मिळाला. पुढील काही सेकंदातच अंतिम शिट्टी वाजली. पंचांनी सिकंदर शेखचा हात उंचावून त्याला विजयी घोषित केले. कुस्ती जरी सिकंदरने जिंकली असली, तरी आखाड्यात उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय मात्र सुदर्शन कोतकरने जिंकले होते. पहिल्या चार कुस्त्यांमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवून पाचव्या कुस्तीत एका ’महाराष्ट्र केसरी’ला अक्षरशः घाम फोडण्याची सुदर्शनची कामगिरी अविस्मरणीय होती.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ