अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून खर्डा, नागोबाचीवाडी आणि पांढरवाडी या तीन स्वतंत्र ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार, खर्डा ग्रामपंचायतीमध्ये खर्डा महसुली गाव, नागोबाचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये नागोबाचीवाडी व मुंगेवाडी महसुली गावे, तर पांढरवाडी ग्रामपंचायतीमध्ये पांढरवाडी व दरडवाडी महसुली गावांचा समावेश राहणार आहे. ही अधिसूचना १७ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे.
या निर्णयामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजास अधिक सुलभता येण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.










