विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय
पाथर्डी | नगर सह्याद्री
तालुक्यातील लोहसर येथील श्रीकाळभैरवनाथांच्या यात्रेची कुस्त्याच्या हगाम्याने सांगता झाली. यापुढे लोहसर यात्रेतील कुस्त्यांच्या हगाम्याचा कार्यक्रम बंद करण्यात आला असून, त्याऐवजी बैलगाडा व घोड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात येणार आहेत.
पाथर्डी तालुयातील लोहसर येथे श्रीकाळभैरवनाथांची मोठी यात्रा भरते. तालुयाच्या पश्चिम भागातील ही मोठी यात्रा समजली जाते. तीन दिवस चालणार्या या यात्रेची काल कुस्त्याच्या हगाम्याने सांगता झाली.
कुस्ती खेळ मर्दानी आणि मैदानी समजला जायचा, पहिलवान कुस्त्या चितपट करीत असत, ती कुस्ती आज पहायला मिळत नाही. ठरवून कुस्त्या खेळणार्या पहिलवानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील भैरवनाथ ट्रस्ट कमिटीने पुढील वर्षांपासून यात्रेनिमित्त भरविण्यात येत असलेला कुस्त्यांचा हगामा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हगामा स्टेडियमच्या जागी विद्यार्थ्यांना एमपीएससी तसेच युपीएससी परीक्षेची तयारी करता येईल, असे अत्याधुनिक वाचनालय आणि फळबाग व शेतीविषयी मार्गदर्शक केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. रुढी, परंपरा कुचकामी व निरोपयोगी ठरत असतील तर त्या काळानुसार बदलल्या पाहिजेत, असे मत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गिते यांनी व्यक्त केले.
श्रीकाळ भैरवनाथ ट्रस्टने बक्तरपूरला यात्रेचा सर्व मान देणे, देवाची दैवी सावकारकी (फंड) बंद करणे, छबीना पालखी मार्गात बदल करणे, तेल, नारळ, अगरबत्ती, पानफुल बंद करणे, महिलांना मंदिरात प्रवेश देणे, असे अनेक ऐतिहासिक निर्णय देवस्थानने घेतलेले आहेत. आता कुस्त्यांचा हगामा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
-अनिल गिते, अध्यक्ष, भैरवनाथ देवस्थान लोहसर










