केवळ तीन जागांसाठीच मतदान; विरोधकांना पूर्ण पॅनल उभे करण्यात अपयश
सोनई | नगर सह्याद्री
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील गटाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुवारी (दि. १८) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतर गडाख गटाचे तब्बल १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले. आता केवळ तीन जागांसाठीच मतदान होणार आहे. यामध्ये करजगाव गटातील दोन जागा आणि महिला प्रतिनिधी मतदारसंघातील एका जागेचा समावेश आहे.
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर विरोधी गटाकडून सर्व जागांवर जोरदार लढत देण्याचे दावे करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत विरोधकांना सर्व जागांसाठी उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यामुळे २१ पैकी १८ जागांवर गडाख गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, विरोधी गटाला केवळ तीन जागांसाठीच निवडणूक लढवावी लागणार आहे.तीन जागांसाठी होणार्या निवडणुकीकडे तालुयाचे लक्ष लागले आहे.
सोनई गटातून वसंत चिमा कुसळकर, छाया भास्कर भुसारी आणि दिनकर अंबादास घावटे हे तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. घोडेगाव गटातून लक्ष्मण तुळशीराम पांढरे, एकनाथ मारुती जगताप आणि दत्तात्रय भानुदास बर्हाटे यांची निवड झाली आहे. खरवंडी गटातून बापूसाहेब शंकर शेटे, भाऊसाहेब निवृत्ती मोटे आणि सोपान विठ्ठल विरकर हे संचालकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. नेवासा गटातून बाळासाहेब पुंजाजी भणगे आणि त्रिंबक काशिनाथ सुकाळकर यांची बिनविरोध निवड झाली. प्रवरासंगम गटातून बाळासाहेब दादा पाटील आणि पांडुरंग श्रीरंग निपुंगे यांना बिनविरोध संचालकपद मिळाले.सहकारी संस्था मतदारसंघातून स्वतः शंकरराव गडाख, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शंकर पंढरीनाथ कदम, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भाऊसाहेब हरिभाऊ भालके आणि विमुक्त जाती-भटया जमाती विशेष मागास प्रवर्गातून बाळासाहेब भाऊलाल परदेशी यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
करजगाव व महिला मतदारसंघात रंगणार चुरस
करजगाव गटातील दोन जागांसाठी मात्र निवडणूक होणार असून, गडाख गटाचे ज्ञानेश्वर रामराव दरंदले आणि चंद्रकांत भानुदास टेमक यांच्या विरोधात किरण जाधव, नारायण डौले तसेच अपक्ष उमेदवार गोरक्षनाथ जाधव मैदानात आहेत. महिला प्रतिनिधी मतदारसंघात गडाख गटाच्या कमल चांगदेव दहिफळे आणि विमल नारायण सोनवणे यांच्याविरोधात मीरा दिवटे यांनी उमेदवारी कायम ठेवली. या जागेसाठीही मतदान होणार आहे.
सहकारात गडाख गटाची ताकद कायम
मुळा सहकारी साखर कारखाना हा नेवासा तालुयातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १८ जागांवर बिनविरोध विजय मिळवून गडाख गटाने आपली संघटनात्मक ताकद आणि मतदारांवरील प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. विरोधी गटाला संपूर्ण पॅनल उभे करण्यात आलेले अपयश हे या निवडणुकीतील सर्वात चर्चेचे वैशिष्ट्य ठरले आहे.










