मुंबई-नाशिकसह लांब पल्ल्याच्या बस फेर्या रद्द | प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल; ग्रामीण भागातील दळणवळणही विस्कळीत
गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर बस आगाराला सध्या डिझेलच्या तीव्र टंचाईचा मोठा फटका बसला. यामुळे संपूर्ण तालुयातील बस सेवा विस्कळीत झाली आहे. डिझेलचा पुरवठा अपुरा पडत असल्याने आगाराने नाशिक आणि मुंबई यासारख्या महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या बस फेर्या तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम दैनंदिन प्रवास करणार्या प्रवाशांवर आणि शालेय विद्यार्थ्यांवर होत असून तालुयात संतापाचे वातावरण आहे.
पारनेर आगाराच्या ताफ्यात एकूण ४८ बस गाड्या आहेत. त्यापैकी सुमारे २० गाड्या तालुयातील ग्रामीण भागात सेवा देतात, तर उर्वरित गाड्या मुंबई, नाशिक, पुणे यांसारख्या शहरांसाठी लांब पल्ल्यावर धावतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने आगारासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या केवळ ठराविक ठिकाणच्या बस सुरू ठेवण्यात आल्या असून, अनेक मार्गांवरील फेर्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत.
तालुयातील ग्रामीण भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने एसटी बसवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील २० पैकी काही मोजयाच बस सध्या सुरू असल्याने वेळेवर बस मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे किंवा खासगी वाहनांचा महागडा प्रवास करावा लागत आहे.
शैक्षणिक वर्षाच्या महत्त्वाच्या काळातच बस सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एसटी बस बंद असल्याने प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत अनेक खासगी वाहतूकदार प्रवाशांकडून जादा भाडे आकारत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्याने नोकरीनिमित्त बाहेर जाणार्यांचेही हाल होत आहेत.सध्या डिझेलच्या कमतरतेमुळे सर्वांनाच मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरून डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत. पारनेर आगाराने तातडीने डिझेल उपलब्ध करून देऊन ही सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
डिझेलच्या कमतरतेने समस्या
युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे काही पारनेर आगाराच्या बस गाड्या या बंद होत्या परंतु प्रवासी असलेल्या बस गाड्या आम्ही सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची कोणतीही अडचण होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. डिझेलची व्यवस्था सुरळीत केली असून पुन्हा वाहतूक पूवर्वत केली आहे.
– प्रशांत काळे, पारनेर आगारप्रमुख










