खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आईची मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
जमीन नावावर करण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत कट रचून पतीस विषारी औषध पाजले. उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी व तिचा प्रियकर फरार आहे. आईच्या फिर्यादीवरून मृत मुलाची पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्सेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोप आईने करत जिल्हा पोलीस प्रमुखांकडे खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पारनेर तालुक्यातील ढोकी येथील पारूबाई विठ्ठल नर्हे यांनी पारनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ढोकी टोलनाक्याजवळ त्यांची १० एकर शेतजमीन आहे. त्यांचा मुलगा संतोष नर्हे हा पत्नी आशाबाई व दोन मुलांसोबत राहत आहे. लग्न झाल्यापासून आशाबाई हिचे गावातील सुरेश आप्पा नर्हे यांच्यासोबत प्रेमसंबंध आहे. या प्रेमसंबंधात संतोष नर्हे हा अडथळा ठरत असल्याने त्यास मानसिक त्रास देत तू मरून जा, तू मेल्यावर आम्हाला जमीन भेटेल व लग्न करता येईल असे असून म्हणून मारहाण करत होती. तिला समजावून सांगितले असता ती ऐकत नव्हती. २० जून रोजी सकाळच्या सुमारास याच कारणावरून आशाबाई हिने वाद घातला. पती संतोष याला बेदम मारहाण केली. कट रचून त्याला विषारी औषध पाजले. सुरुवातीला त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुसर्या दिवशी संतोष यांचा मृत्यू झाला. संतोष याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असताना त्याची पत्नी आशाबाई ही तिथून पळून गेली. नवर्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्याच्या अंत्यविधीला आली नाही. तिचे असे पळून जाणे व अंत्यसंस्काराला न येण्यातून तिचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होत आहे.
आशाबाई नर्हे व तिचा प्रियकर संतोष आप्पा नर्हे यांनी मानसिक त्रास देऊन संतोष यास आत्महत्या करणार्यास प्रवृत्त केले. विषारी औषध पिऊन संतोष याने आत्महत्या केेल्याने दोघांविरोधात पारेनर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, मृत संतोष याने आत्महत्या केली नसून, त्यास बळजबरीने विषारी औषध पाजले आहे. त्यामुळे आशाबाई नर्हे हिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावा, अशी मागणी पारूबाई नर्हे यांच्यासह त्यांच्या मुलींनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
पोलिसांची निष्क्रियता, आरोपी मोकाट
पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रियकर खुलेआम गावात फिरत असल्याने यातून पारनेर पोलिसांची निष्क्रियता उघड होत आहे. इतर गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात पोलीस जेवढी घाई करतात तसा प्रकार या गुन्ह्यात दिसत नाही. यामुळे पारनेर पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.










