यवतमाळ / नगर सह्याद्री –
गडचिरोलीवरून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडकडे निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. गुरुवारी (२१ मे) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. चंद्रपूर मार्गावरील नवेगाव-मुरखळा परिसरातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर ती भरधाव बस लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या कडेला शेतात उलटली. या अत्यंत दुर्दैवी घटनेत ३ प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. तर ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
गडचिरोली-उमरखेड ही एसटी बस नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ७ वाजता ५१ प्रवाशांना घेऊन गडचिरोलीवरून निघाली होती. ही बस ७.३० वाजेच्या सुमारास नवेगाव-मुरखळा गावाजवळील वळणावर आली असता, अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर ती बस रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी कठडा तोडून खाली घसरली. त्यानंतर ती शेतात उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच गोंधळ आणि हाहा:कार उडाला.
या अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही प्रवाशांना बसच्या खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी झाले होते. तर २१ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. यानंतर किरकोळ जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
७ महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू
या भीषण अपघातात ३ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या मृतांमध्ये एका ७ महिन्यांच्या निष्पाप बाळाचाही समावेश आहे. ख्वाजा शाहबुद्दीन (६०), लक्ष्मीबाई दुरकीवार (५५) आणि शिवांश स्वप्नील नवघरे (७ महिने) अशी या तिघांची नावे आहेत. हा अपघात घडला त्यानंतर शिवांशची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे डॉक्टरांचे पथक त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
तसेच या अपघातातील सर्व जखमींना तात्काळ गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ७ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून जखमींच्या उपचारात कोणतीही कसर भासणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
अपघातातील जखमींची नावे
या अपघातात धनश्री ललित चांदेकर, आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे, ज्योती अविनाश पाल, श्रीहरी खळकर, बेबीबाई खळकर, चैतन्य मेडीवर, तानिया मेडीवर, वैशाली माडेवार, रूपाली खणके, ललिता खणके, ऋषभ खडके, सचिन वाळके, जयश्री वरभे, सचिन वरदे, जयश्री खाणके, रत्नाकर राऊत, पार्थ राऊत, मंगला कळसकर, भूषण दुरकीवार, चालक रोहित देशमुख (रा. अकोला), वाहक संदीप प्रल्हाद पवार, विकी सुरेश शेंडे, तारा साबळे (सर्व रा. वणी, जि. यवतमाळ), श्वेता स्वप्नील नवघरे (रा. चामोर्शी), डॉ. गणेश जैन, सुमन कत्तलवार, व्यंकट ढगे, अश्विनी तोरपे आणि गौरव कुमरे यांच्यासह इतर प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गडचिरोली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.










