अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
राज्यातील ९ हजार ५८९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत जवळपास ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग एक भरून नोंदणी केलेली आहे. यात नगर जिल्ह्यातील ४५४ कनिष्ठ महाविद्यालयात ५४ हजार विद्यार्थ्यांनी ११ प्रवेशासाठी भाग १ नुसान नोंदणी केलेली आहे. सोमवारपासून (दि.११) पासून अकरावी प्रवेशाचा पुढील टप्पा सुरु झाला आहे.
दरम्यान, अकरावीच्या प्रवेशाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी १४ आणि १५ मे दरम्यान, तर अंतिम गुणवत्ता यादी १८ आणि १९ मे दरम्यान जाहीर होणार आहे. तर पहिल्या नियमित कॅप फेरीची गुणवत्ता यादी, महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ यादीही २६ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने मागील आठवड्यात शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. निकाल हाती आल्याने विद्यार्थी व पालक आता अकरावी प्रवेशाची धडपड करणार आहेत. दुसरीकडे शिक्षण विभागानेही शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती दिली असून, विद्यार्थ्यांना हीींिीं://ारहरषूक्षलरवाळीीळेपी.ळप या अधिकृत पोर्टलवर अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरून नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा महिनाभरापूर्वीच अर्थात १० एप्रिल २०२६ पासून उपलब्ध करून दिली होती. यात आतापर्यंत ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ भरुन नोंदणी केलेली आहे. सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेचा भाग-१ आणि भाग-२ भरुन प्रवेश नोंदणी सुरु झाली. या प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेर्या होतील. चौथी फेरी ओपन टू ऑल असेल. मुलींकरिता विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवर उपलब्ध माहिती व सूचनेनुसार आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी, असे आवाहनही केले आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे शून्य फेरी आणि नियमित कॅप फेरी १ चे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी, असे शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलेले आहे.










