नेप्ती ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन | नायब तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
नेप्ती येथील चांदपीर वस्ती जामगाव नाला-सीना नदीपात्रात करण्यात आलेले कथित अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे. नदीपात्रात टाकलेली भर व अनधिकृत पुल (बंधारा) काढण्यात यावा या मागणीसाठी नेप्ती ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 18 जून) सकाळी 9 वाजता छत्रपती कॉलेज परिसरात रस्ता रोको आंदोलन केले.
ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात चांदपीर वस्ती परिसरातील सीना नदीवरील काही व्यक्तींनी नदीपात्रात अतिक्रमण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर शेजारील शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. याची दखल न घेतल्यामुळे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात मंडळ अधिकारी, नेप्ती यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा सादर केला. पंचनाम्यानुसार जामगाव नाल्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या प्रवाहाच्या उत्तर बाजूस लगत नदीपात्रात भर टाकण्यात आल्याचे दिसून आले.
संबंधित पुलाच्या बांधकामामुळे सीना नदीचा नैसर्गिक प्रवाहास अडथळत्त झाला आहे. मुसळधार पाऊस झाल्यास हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. पावसाळा सुरू झाल्याने कधीही नदीला पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्यापूव तात्काळ दखल घेऊन अतिक्रमण व अनधिकृत पुल हटवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अभिजीत वांढेकर यांनी संबंधित गटाची मोजणी करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास निर्देश दिले आहेत. तसेच गट क्रमांक 295 मधील बाबासाहेब जाधव, सुरेश जाधव व संजय जाधव यांना पुढील आदेशापर्यंत नदीपात्रात कोणतीही भर टाकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.आंदोलनस्थळी नायब तहसीलदार अभिजीत वांडेकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून भूमी अभिलेख विभागामार्फत आठ दिवसांच्या आत मोजणी पूर्ण करण्यात येईल तसेच नियमांनुसार अतिक्रमणावर दंडात्मक कारवाई करून नदीपात्र मोकळे करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी सरपंच संजय जपकर, सर्कल प्रताप कळसे, शिवा होळकर यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक गणेश वारुळे याच्यासह पोलीस बंदोबस्त तैनात होता.










