- जाहिरात -spot_img
breaking news

जिल्हा बँकेच्या ठरावांवरून राजकारण तापले; जामखेडमध्ये काय घडलं पहा…

नियमांना बगल देऊन ठराव घेतल्याचा शरद कार्ले यांचा आरोप; चौकशी करून संबंधित ठराव रद्द करण्याची मागणी
जामखेड | नगर सह्याद्री

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक (अहिल्यानगर) व्यवस्थापक समितीच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच जामखेड तालुक्यात ठरावांवरून राजकारण तापले आहे. सेवा सहकारी संस्थांचे ठराव घेताना सहकार विभागाने निर्धारित केलेली प्रक्रिया डावलून काही ठिकाणी परस्पर ठराव करण्यात आल्याचा आरोप जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठराव रद्द करण्यात यावेत तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सहकार विभागाकडे केली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव 17 जून ते 16 जुलै 2026 या कालावधीत मागविण्यात येत आहेत. जामखेड तालुक्यात अशा 48 सेवा सहकारी संस्था मतदानासाठी पात्र आहेत. या ठरावांच्या माध्यमातून निवडणुकीतील प्रतिनिधी निश्चित होणार असल्याने ठराव प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शरद कार्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाकी, मोहा, सावरगाव आणि कोल्हेवाडी या सेवा सोसायट्यांचे ठराव मागील काही दिवसांत नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार बैठकीचा अजेंडा काढल्यानंतर संचालक मंडळाला किमान सात दिवसांची मुदत देणे आवश्यक असते. त्यानंतर अधिकृत बैठक घेऊन ठराव मंजूर केला जातो. मात्र संबंधित सोसायट्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण न करता परस्पर ठराव करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात कार्ले यांनी सहकार विभागाचे उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य ठराव रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच सेवा सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्या कार्यालयात अथवा नियमानुसार परवानगी घेऊनच ठराव प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा :  ‘रक्षक दल’ उपक्रमाचे राज्यभर विस्ताराचे संकेत?; मंत्री आदिती तटकरे यांची आमदार सत्यजीत तांबे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 20 जानेवारी 2026 रोजी संपुष्टात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 तसेच सुधारित नियम 2017 नुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठराव प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे कार्ले यांनी म्हटले आहे.दरम्यान, जामखेड तालुक्यातील 14 सेवा सोसायट्यांचा कारभार सध्या जामखेड येथील खरेदी-विक्री संघाच्या जागेतून सुरू असल्याचे सांगत, त्या संस्थांचे ठराव आणि इतर प्रशासकीय कामकाज त्यांच्या मूळ कार्यक्षेत्रातच व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बँकेच्या संचालक मंडळावर शेतकरी हिताचे प्रतिनिधी निवडून जाण्यासाठी निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असणे गरजेचे असल्याचे कार्ले यांनी स्पष्ट केले.

नियमांचे उल्लंघन झाले असल्यास ते ठराव रद्द करा ः सभापती कार्ले
वाकी, मोहा, सावरगाव आणि कोल्हेवाडी या सेवा सोसायट्यांचे ठराव सहकार विभागाने निश्चित केलेली प्रक्रिया न राबवता घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार अजेंडा काढल्यानंतर सात दिवसांची मुदत देणे आवश्यक असते. नियमांचे उल्लंघन झाले असल्यास चौकशी करून संबंधित ठराव रद्द करण्यात यावेत अशी मागणी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केली आहे.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ