राहुरी | नगर सह्याद्री
एक सराफ व्यापारी झोपेत असताना एका महिलेने त्यांच्या सोबत फोटो काढले. तसेच व्हिडिओ कॉल करुन त्याचे स्क्रिनशॉट काढले. नंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोन महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण गंगाधर उदावंत (वय 47 वर्षे) हे सराफ व्यापारी असुन ते राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे राहतात. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, किरण उदावंत यांची पत्नी घरात नसल्याने आईची व मुलांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी पहा असे त्यांनी त्यांची नातेवाईक मंदा मैड हिला सांगितले होते. तेव्हा तिने सांगितले की, माझी मुलगी मनिषा हि कामाला येत जाईल. त्यानंतर मनिषा मैड हिच्या भावाचे लग्नासाठी किरण उदावंत हे संगमनेर तालुक्यातील आधी येथे गेले होते.
रात्रीच्या वेळी ते घरात झोपलेले असताना आरोपी मनिषा मैड हिने त्यांच्या सोबत झोपलेल्या अवस्थेत काही फोटो काढले. त्यानंतर ती किरण उदावंत यांना म्हणाली कि, मला तुम्ही आवडता, माझे तुमच्यावर प्रेम आहे. नंतर तीने बऱ्याच वेळा व्हिडिओ कॉल करुन त्याचे स्क्रीनशॉट काढुन ठेवले. तेव्हा किरण उदावंत यांनी विरोध केला असता तिने मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखवुन ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी महिला म्हणाली की, तु एकतर आम्हाला 10 लाख रुपये दे, नाहीतर तु माझी मुलगी मनिषा मैड हिच्याशी लग्न कर. तेव्हा किरण उदावंत यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी दि. 24 जानेवारी 2025 रोजी किरण उदावंत यांच्याकडुन लग्न करण्या बाबत संगमनेर येथे बळजबरीने नोटरी करुन घेतली.
त्यानंतरही उदावंत यांनी लग्नाला विरोध केला असता त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला. नंतर आरोपींनी राहुरी येथील उदावंत यांच्या दुकानात जाऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर उदावंत यांनी तिला कधी 5 हजार कधी 10 हजार रुपए फोन पे तर कधी रोख रक्कम देत होते. दि. 9 जुलै 2026 रोजी आरोपी महिला उदावंत यांच्या राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड येथील दुकाना समोर आल्या आणि पुन्हा धमकी देवून 10 लाख रुपये खंडणीची मागणी केली. उदावंत यांनी दि. 15 जुलै 2026 रोजी आरोपी मनिषा मैड हिला खंडणी म्हणुन 2 लाख रुपये दिले. त्यानंतर किरण गंगाधर उदावंत यांनी आरोपी महिलांच्या त्रासाला कंटाळून राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी मनिषा दिलीप मैड व मणियार नामक एक महिला अशा दोन महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
अंमली पदार्थांची विक्री, दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड
तीन आरोपी अटकेत, दोन फरार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्त घालत असताना, पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणारी आणि दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली एक मोठी टोळी पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सतिष साहेबराव त्रिभुवन यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस अधिकारी योगेश चाहेर आणि त्यांचे पथक तारकपूर परिसरातील मिस्कीनमळा येथे गस्त घालत होते. त्यावेळी दर्गा परिसरात एक विना क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद रितीने उभी असलेली दिसली. पोलिसांनी कारजवळ जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, कारमधील दोन जण तातडीने पळून गेले. उर्वरित तिघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन कार पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दक्ष पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पोलीस ठाण्याच्या गेटसमोर पकडले.कारची झडती घेतली असता, पोलिसांना कारमध्ये अत्यंत धक्कादायक वस्तू मिळून आल्या. कारमध्ये एकूण 150.87 ग्रॅम वजनाची पांढरी पावडर आणि 4.35 ग्रॅम वजनाची तपकिरी पावडर सापडली. आरोपींनी ही पावडर मॅफेड्रॉनफ (एम.डी.) नावाचा घातक अंमली पदार्थ असून ती विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. याशिवाय कारमध्ये रबरी मुखवटे, तीक्ष्ण चाकू, हातमोजे, दोरी, पाने आणि खेळण्यातील बंदूक अशी दरोडा टाकण्यासाठी लागणारी घातक हत्यारे व साधने सापडली. हा सर्व माल जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत 36 लाख 39 हजार 874 रुपये आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कारचालक जिशान शौकत सय्यद (वय 26, राहणार मुकुंदनगर), रिहान जावेद शेख (वय 26, राहणार मुकुंदनगर) आणि वसिम खलिल बागवान (वय 38, राहणार पिंजार गल्ली) या तिघांना अटक केली आहे. तसेच पळून गेलेला त्यांचा साथीदार जमीर निसार शेख आणि एका अनोळखी इसमाचा पोलीस शोध घेत आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
कलाकेंद्राच्या नावाखाली सव्वा लाखाची फसवणूक
अहिल्यानगर : केडगाव परिसरातील मराठानगर येथे एक फसवणूक आणि चोरीची घटना समोर आली आहे. कलाकेंद्रातील कार्यक्रमासाठी आगाऊ रक्कम घेऊनही कामावर न जाता विश्वासघात केल्याप्रकरणी आणि घरातील कपाटातून रोकड चोरल्याप्रकरणी दोन महिलांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोमल नंदा काळे (वय 27, रा. मराठानगर, भाग्योदय मंगल कार्यालयाजवळ, केडगाव, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी पूजा भोसले आणि दिव्या बनसोडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी कोमल काळे यांनी आरोपी पूजा आणि दिव्या यांना कलाकेंद्रातील पाटमध्ये काम करण्यासाठी आगाऊ रक्कम (उचल) म्हणून 1 लाख रुपये रोख दिले होते. मात्र, दोन्ही आरोपी महिलांनी फिर्यादीचा विश्वासघात केला आणि ठरल्याप्रमाणे कलाकेंद्राच्या पाटमध्ये काम न करताच तिथून निघून गेल्या.इतकेच नव्हे तर, घरातून जाताना आरोपींनी कपाटात ठेवलेली 35,000 रुपयांची रोकडही फिर्यादीच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली. एकूण 1 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक आणि चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोमल काळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोविंद गोल्हार करत आहेत.










