श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील माठ गावात शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर तलवार व कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसे येथील रहिवासी अशोक कांतीलाल गव्हाणे (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. 10 ) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास म्हसे गावच्या शिवारातील गट क्रमांक 168 मधील शेतात ही घटना घडली. जमिनीच्या वादातून आरोपी रामदास प्रकाश पवार, प्रकाश मास्तर पवार, दीपक भास्कर पवार, प्रदीप दीपक पवार, गोरख भास्कर पवार (सर्व रा. माठ, ता. श्रीगोंदा) तसेच विष्णू शांताराम गव्हाणे (रा. म्हसे) यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर तलवार व कोयत्याने शरीरावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांना वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नातेवाईकांनाही आरोपींनी धमकावल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस करीत आहे.










