आमदार संग्राम जगताप यांची एकविरा चौक ते तपोवन रोड काँक्रिटीकरण कामाची पाहणी; मनपा अतिक्रमण व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी / विकासकामांना अडथळा ठरणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत शासनाकडे तक्रार करणार; नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्याचे आदेश
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्था, नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांच्या सोयीसाठी ही कामे सुरू करण्यात आली. मात्र काही रस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत तर काही रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाने वेळेत लाईनआऊट देणे आणि अतिक्रमण विभागाने अडथळे दूर करणे गरजेचे असताना संबंधित विभागांकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे विकासकामांना अडथळे निर्माण होत असल्याची तीव्र नाराजी आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. दरम्यान, शहरातील ओढे-नाले बुजविणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही शासनाकडे करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या एकविरा चौक ते तपोवन रोड दरम्यानच्या काँक्रिटीकरण रस्ता कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती दिपालीताई बारस्कर, उपसभापती वर्षाताई सानप, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, महेश तवले, सुनील त्रिंबके ऋग्वेद गंधे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, किशोर डागवले, अविनाश घुले, गणेश कवडे, महेश लोंढे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, मनोज पारखे, इंजिनिअर आदित्य बल्लाळ, इंजिनिअर गणेश गाडळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरातील विकासकामे ही पुढील वीस वर्षांचा विचार करून कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली जात आहेत. मात्र महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे ही कामे रखडत आहेत. रस्ते विकासासाठी आवश्यक असलेले लाईनआऊट वेळेत दिले जात नाहीत, अतिक्रमण हटविले जात नाही आणि त्यामुळे ठेकेदारांना काम करताना अडचणी येतात. काही ठिकाणी कामे सुरू होतात आणि अचानक थांबतात. यामुळे नागरिकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत असून व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.
ते पुढे म्हणाले की, ठेकेदारांनी लाईनआऊट मिळाल्याशिवाय काम सुरू करू नये आणि एकदा काम सुरू केल्यावर ते अर्धवट सोडू नये. शहरातील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुली करण्यात यावीत. महापालिका अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे विकासकामांना अडथळे निर्माण होत असल्याने त्यांच्या विरोधात शासनाकडे कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी गंभीर आरोप करत सांगितले की, शहरातील अनेक ओढे आणि नाले बुजविण्याच्या प्रकारांना काही अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष संरक्षण मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडत आहेत. शहरातील ओढे-नाले बुजविणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही शासनाकडे करण्यात येणार आहे. स्वतःची जबाबदारी झटकून एकमेकांवर दोषारोप करण्याचे काम काही अधिकारी करत असून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.
एकविरा चौक ते तपोवन रोड हा रस्ता मूळ आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा असताना प्रत्यक्षात तो १५ ते १७ मीटरच भरला जात असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेची मालकी नेमकी कुठपर्यंत आहे हे आधी निश्चित करूनच पुढील विकासकामे करण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच पावसाळा सुरू झालेला असल्याने नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असून महापालिका प्रशासन व ठेकेदारांकडून अपेक्षित वेग दिसून येत नाही. पावसाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
एकविरा चौक ते तपोवन रोड या रस्त्याची पाहणी करून विविध सूचना देण्यात आल्या असून हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्धवट खोदलेले रस्ते, वाहतुकीच्या अडचणी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान या समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रशासनाने कामाला गती देणे आवश्यक आहे. शहरातील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक निखिल वारे यांनी यावेळी नगररचना विभागाच्या कारभारावर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, एकविरा चौक ते तपोवन रोड हा रस्ता २४ मीटरचा असताना प्रत्यक्षात पूर्ण रुंदीने विकसित होत नाही. त्यामुळे महापालिकेची जागा नेमकी कुठे गेली हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगररचना विभागातील अधिकारी-कर्मचारी चुकीच्या पद्धतीने काम करत असल्यामुळे अनेक बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत. विभागाचा गलथान कारभार महापालिकेच्या मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. गोरगरीबांची अतिक्रमणे तातडीने हटविली जातात; मात्र धनदांडग्यांना संरक्षण दिले जाते. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले की, या रस्त्यालगतचे अनेक ओढे व नाले बुजविण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. ही गंभीर समस्या असून त्यावर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करून देणे गरजेचे आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांची कामे सुरू झाली असून ती तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांनी जलद गतीने कामे पूर्ण करावीत. पुढील अनेक वर्षांचा विचार करून कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध विकासकामे करण्यात यावीत. सध्या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दळणवळणासाठी तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली










