जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी, स्वच्छता कर, शालेय कर आणि दवाखाना कराच्या नव्या आकारणीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आक्रमक झाला आहे. आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चुकीची करआकारणी तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा सात दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नगरपरिषदेकडून मालमत्तांचे सर्वेक्षण करून नव्याने करआकारणी करण्यात आली आहे. मात्र संबंधित एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात अनेक गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. चुकीच्या मोजमापाच्या आधारे अनेक मालमत्तांवर अवास्तव घरपट्टी, स्वच्छता कर, शालेय कर आणि दवाखाना कर आकारण्यात आल्याने नागरिकांवर आर्थिक बोजा पडत असून शहरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे करण्यात आलेली वाढीव करआकारणी तात्काळ रद्द करून पूवप्रमाणे करआकारणी लागू करावी, संबंधित सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीची नियुक्ती रद्द करावी तसेच सक्षम व अनुभवी नवीन एजन्सीमार्फत संपूर्ण नगरपरिषद हद्दीचे फेरसर्वेक्षण करावे, अशी मागणी केली आहे. फेरसर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच नियमानुसार नवीन करआकारणी लागू करण्यात यावी, अशीही भूमिका पक्षाने मांडली आहे.या मागण्यांवर सात दिवसांच्या आत प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन, रास्ता रोको तसेच अन्य लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, नगरसेवक राजेंद्र गोरे, इस्माईल सय्यद, वसीम शेख, प्रकाश काळे, प्रा. लक्ष्मण ढेपे, नासीर चाचू सय्यद, हरिभाऊ आजबे, प्रा. कुंडल राळेभात, डॉ. नरसाळे, धनराज राजगुरू, बजरंग डुचे, दादा महाडिक, सचिन शिंदे, अनिल अडाले, इम्रान तांबोळी, अक्षय पोकळे, सोहेल सय्यद, इब्राहिम सय्यद, भाऊसाहेब केवडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










