आरोपींना पळवण्याचा प्रयत्न | शासकीय कामात आणला अडथळा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
वैदुवाडी परिसरात एका गुन्ह्याच्या तपासासाठी आणि घरझडतीसाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही महिलांनी हल्ला करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी छाया कैलास गायकवाड यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एका गुन्ह्यातील अटक आरोपी नितीन मच्छिंद्र शिंदे आणि विशाल संतोष शिंदे यांना सोबत घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक वैदुवाडी येथे तपास करण्यासाठी गेले होते. पोलीस पथक आरोपींच्या घराची झडती घेणार तितक्यात तेथे पाच ते सात महिलांचा बेकायदेशीर जमाव गोळा झाला. तुम्ही आमच्या माणसांना का अटक केली आणि आमच्या परिसरात तपासाला का आले? असे म्हणून या महिलांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर या जमावलेल्या महिलांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व झटापट केली. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींना बळजबरीने पळवून नेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. या गोंधळात आरोपी नितीन शिंदे याचा पोशाखही फाटला.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून निकीता निखिल शिंदे या 25 वषय महिलेला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिने गुन्ह्यात सोबत असलेल्या इतर महिलांची नावे शांताबाई मच्छिंद्र शिंदे आणि अश्विनी सुरज शिंदे अशी असल्याचे सांगितले.
या प्रकरणी छाया गायकवाड यांच्या फिर्यादीवरून निकीता शिंदे, शांताबाई शिंदे, अश्विनी शिंदे आणि इतर तीन ते चार अज्ञात महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे करत आहेत.
देहऱ्यातील डांबर प्लॅण्टवर ऑईल चोरीचा प्रयत्न; दोन आरोपींना रंगेहाथ पकडले
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या देहरे गावातील एका डांबर प्लॅन्टवर चोरीचा प्रयत्न फसला आहे. पुणे येथील मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकीच्या या प्लॅन्टवरून तब्बल 60 हजार रुपये किमतीचे हायड्रॉलिक ऑईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पकडण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहरे येथील डांबर प्लॅन्टवर 8 जुलै 2026 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्लॅन्टवर खाजगी नोकरी करणारे गणेश मुरलीधर चौधरी (55 वर्ष) यांनी या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुस्ताक खुदाबक्श शेख (वय 29 वर्षे) आणि किरण उर्फ बुट्या भाऊसाहेब जाधव (दोन्ही राहणार देहरे, ता. जि. अहिल्यानगर) या दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
हे आरोपी प्लॅन्टमधील दोनशे लिटर क्षमतेच्या तीन ड्रममधून सुमारे 300 लिटर हायड्रॉलिक ऑईल चोरण्याचा प्रयत्न करत होते. या ऑईलची 60 हजार रुपये एवढी आहे. हा चोरीचा प्रयत्न सुरू असतानाच ही बाब उघडकीस आली. यानंतर रात्री आठ वाजता एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरात आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खेडकर हे पुढील तपास करत आहेत.
कंपनी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
अहिल्यानगर ः येथील एमआयडीसी भागातील एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी मुख्य आरोपींसह चार जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जी.के.एन. सेंटर प्राईव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. आरोपी समीर शेवाळे, प्लांट हेड पुरुषोत्तम ऋषी, सेक्युरिटी बाबासाहेब निर्मळ आणि उपअध्यक्ष विठ्ठल हंडोरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित व्यक्तीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला. या सततच्या छळाला कंटाळून अखेर त्या कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवले. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने एमआयडीसी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक मोंढे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी समीर शेवाळे, पुरुषोत्तम ऋषी आणि बाबासाहेब निर्मळ यांना ताब्यात घेतले.










