प्रलंबित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील आणे-नांदूर पठार मार्गावरील प्रलंबित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी नांदूर पठार ग्रामपंचायतीचे सदस्य अरुण आग्रे व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तसेच जिल्हा परिषद सदस्या स्मिता कणसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्याथ व वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने हा प्रश्न तातडीने माग लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
आणे, नांदूर पठार आणि परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा मार्ग पुणे आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमधील महत्त्वाचा दुवा मानला जातो. दररोज या मार्गावरून शेकडो नागरिक विविध कामांसाठी प्रवास करतात. विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालये, शेतकऱ्यांची बाजारपेठ व व्यावसायिकांची दैनंदिन ये-जा या रस्त्यावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही काळापासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता खराब झाल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे.रस्त्याच्या कामासाठी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप अपेक्षित गतीने काम पूर्ण झाले नसल्याची खंतही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी नांदूर पठार ग्रामपंचायत सदस्य अरुण आग्रे, शंकर आग्रे, विष्णू ठुबे, अमित आग्रे, सुनील गाडगे, गंगाधर आग्रे, श्रेयस आग्रे, अक्षय आग्रे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित, सुकर व दर्जेदार वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करा
आणे-नांदूर पठार हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता विद्याथ, शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
-अरुण आग्रे, ग्रामपंचायत सदस्य, नांदूर पठार










