पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ निलंबित
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पदाचा गैरवापर करणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. राजेंद्र देवमन वाघ असे या निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्यांच्यावर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ही कारवाई केली.
गेल्या वर्षीच राजेंद्र वाघ यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये दोघांची नावे हेतुपुरस्सर अडकवण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी स्वत।च्या आर्थिक लाभासाठी बेकायदेशीरपणे हप्त्याची मागणी केली होती. परंतु, समोरच्या व्यक्तींनी हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे वाघ यांनी संबंधितांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या गंभीर प्रकारानंतर वाघ यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीच्या काळात त्यांनी पुराव्यांशी छेडछाड करू नये किंवा साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये, यासाठी पोलीस अधीक्षकांनी त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन काळात वाघ यांना खाजगी नोकरी किंवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. जर त्यांनी असा प्रयत्न केला, तर त्यांचा उदरनिर्वाह भत्ता बंद करून त्यांच्यावर वेगळी कारवाई केली जाईल. तसेच त्यांना अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात दररोज हजेरी लावण्याचे आणि दर शुक्रवारी कवायत मैदानावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.










