सुपा | नगर सह्याद्री
सुपा एमआयडीसी परिसरात मंगळवारी रात्री शिवाई एसटी बस पलटी झाली. भरपावसात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची घटना घडताच स्थानिक नागरिक व युवकांनी तातडीने मदतकार्य राबवत बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच रस्त्यावर आडवी झालेली बस तातडीने हटवून वाहतूक सुरळीत केली.
नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा येथे रात्री पाऊस पडत असताना एसटी बसचा अपघात झाला. बस पलटल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सुपा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा पारनेर तालुका दूध संघाचे संचालक दत्तानाना पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. बचावकार्यात सहभागी होत जखमी प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिकांशी व आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधला. त्यांच्या तत्परतेमुळे अनेक जखमी प्रवाशांना वेळेत मदत मिळाली.अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी बस हटवून वाहतूक सुरळीत केली.










