पाथर्डी / नगर सह्याद्री –
नगर ते पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भंगार मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र ट्रकमधील मोठ-मोठे लोखंडी पाईप रस्त्यावर आडवे झाल्याने सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती.

नगर ते पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यावरुन जालना येथे मोठ-मोठे चौकोनी पाईप घेऊन जात असलेल्या ट्रकचे (एमएच २४ ए यु-३५९०) ब्रेक करंजी घाटात निकामी झाल्याने ट्रक घाटाच्याकडेला पलटी झाला. या ट्रकमधील चौकोनी लोखंडी पाईप मात्र रस्त्यावर आल्याने या महामार्गावरील वाहतुक सुमारे एक तास खोळंबली होती.

या अपघातात ट्रक चालक दत्तात्रय हरिभाऊ बांगर (रा. कासारी, ता. केज, जि. बीड) याने ट्रकचे ब्रेक निकामी होऊनही प्रसंगावधान दाखविले. ट्रक घाटाच्याकडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्ग पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली.










