साकत येथे घडली दुर्घटना
जामखेड | नगर सह्याद्री
शेतीच्या मशागतीसाठी बैलगाडी घेऊन जात असताना रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. बैलगाडीला टायरची चाके असल्याने गाडीला करंट आला नाही. त्यामुळे गाडीतील पाच जणांना विजेचा धक्का बसला नाही. त्यामुळे या अपघातातून ते बचावले. जामखेड तालुक्यातील साकत शिवारात सोमवारी दुपारी ही घटना घडली.
सोमवारी दुपारी संभाजी नवनाथ वराट हे शेती मशागतीसाठी बैलगाडी घेऊन साकत-कडभनवाडी येथील बारले शिवारात चालले होते. यावेळी संभाजी वराट यांच्यासोबत बैलगाडीतून शहाजी महादेव वराट, संगीता शहादेव वराट, सोहम संभाजी वराट, एकनाथ नारायण वराट असे पाच जण होते. रस्त्यावर तुटलेल्या तारेवरून बैल चालले असता बैलांचा तारेला स्पर्श झाला. विजेच्या जोरदार धक्क्याने दोन्ही बैल जागीच कोसळले व जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. बैलगाडीला टायरचे चाके असल्याने गाडीला करंट आला नाही. यामुळे गाडीतील पाच जण बचावले. बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. पेरणी तोंडावर आली असताना बैल गेले. आता शेती मशागतीचे काम कसे करावयाचे असा प्रश्न वराट यांच्यासमोर आहे. मृत बैलांसाठी शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्याला महावितरणकडून मदत मिळण्यासाठी सर्व प्रकिया लवकरात लवकर केली जाईल, असे महावितरणचे अभियंता विशाल शिंदे यांनी सांगितले.
वराट यांना अश्रू अनावर
मुलाप्रमाणे डोळ्यांदेखत बैल मरण पावल्याने वराट यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वायरमन वसंत सावंत, पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण मोटेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे










