होळीतील धूळ, राख आणि मैत्रीचा अनोखा संगम
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात आज धूलिवंदनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सावेडी येथील श्रमिकनगर भागात तसेच दातरंगे मळा येथील श्री एकदंत कॉलनी परिसरात बालगोपाळांनी रंगांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. सकाळपासूनच लहान मुलामुलींनी एकत्र येत रंग, पाणी, होळीची राख आणि धूळ लावून पारंपरिक पद्धतीने धूलिवंदन केले. परिसरात होळी रे होळीच्या जल्लोषात वातावरण रंगून गेले होते.
यावेळी बालगोपाळांनी आपल्या मित्रमैत्रिणींना रंग भरवत, होळीतील पवित्र राख कपाळी लावत आणि माती लावून एकमेकांतील प्रेम, आपुलकी आणि मैत्रीचे नाते अधिक दृढ केले. कुणी गुलाल उधळत होते, तर कुणी पारंपरिक पद्धतीने धूळ लावून आनंद व्यक्त करत होते. लहानग्यांच्या चेहर्यावर उमटलेले हास्य आणि रंगांनी नटलेले अंगण पाहून पालकांनाही बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्या.
धूलिवंदन हा सण होळीच्या दुसर्या दिवशी साजरा केला जातो. होळीच्या अग्नीत दुष्ट प्रवृत्तींचा नाश होतो आणि त्यानंतर दुसर्या दिवशी राख व धूळ लावून अहंकाराचे दहन झाल्याचे प्रतीक मानले जाते. पौराणिक कथेनुसार प्रल्हादच्या भक्तीसमोर होलिकाचा पराभव झाला, याचे स्मरण म्हणून होळी साजरी केली जाते. धूलिवंदनाच्या दिवशी रंग उधळत वादविवाद विसरून समाजात एकोपा आणि बंधुभाव वाढविण्याचा संदेश दिला जातो. नगर शहरातील विविध भागांतही धूलिवंदन मोठ्या आनंदात पार पडले. काही ठिकाणी नागरिकांनी सेंद्रिय रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला. एकमेकांना शुभेच्छा देत रंगपंचमीपर्यंत चालणार्या या रंगोत्सवाची सुरुवात उत्साहात झाली असून, शहरात सर्वत्र आनंद, उत्साह आणि सामाजिक एकात्मतेचे चित्र पाहायला मिळाले.










