मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले ‘नाट्य’ अद्याप संपलेले नाही, असेच चित्र सध्या दिसत आहे. २०२२ मध्ये शिवसेनेतील मोठ्या बंडांनंतर आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी तूर्तास ‘ऑपरेशन टायगर’ऐवजी ‘ऑपरेशन तुतारी’ सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांचे खासदार शिंदेच्या रडारवर आले असून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हालचाली तीव्र झाल्या आहेत.
राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून ४० आमदार आणि काही खासदारांसह भाजपच्या साथीने राज्यात सत्तांतर घडवून आणले होते. त्यातून महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर काही महिन्यांतच अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंडखोरी करत सरकारमध्ये सहभाग नोंदवला. या दोन मोठ्या धक्क्यांमुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले होते. आता तोच पॅटर्न पुन्हा राबवला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दिल्लीतील बैठकीत खलबतं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपासून ते ऑपरेशन टायगर-तुतारीची चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची तातडीने बैठक बोलावली होती.
आता, एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतरच शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे यांनी केलेल्या एका विधानाने या चर्चेला अधिक बळकटी दिली आहे. वाघमारे यांनी सूचक वक्तव्य केले होते. विरोधकांच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण असून, शरद पवार आपल्या खासदारांना वाचवण्यात यशस्वी होतात की पुन्हा एकदा राज्यात मोठी फोडाफोडी पाहायला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदारांना आमिषं अन् ऑफर्स…
एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना हेरण्याचे आणि त्यांना विविध आमिषे दाखवून आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एका नेत्याने दिली. या हालचालींची कल्पना संबंधित नेत्याने पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांना वेळोवेळी दिली आहे. मात्र, इतकी गंभीर माहिती समोर येऊनही पक्षनेतृत्वाकडून त्यावर अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, आमच्या पक्षात खासदारांची मने जाणून घेण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी अद्याप अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा राबवण्यात आली नसल्याचे खंत या राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली.
ठाकरे-पवारांचे 6-6 खासदार शिंदेंच्या गळाला?
ऑपरेशन टायगर अंतर्गत राबवणाऱ्या ॲापरेशन तुतारीला भाजप हायकमांडने ब्रेक लावल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना ॲापरेशन तुतारी राबवण्यास भाजपकडून रेड सिग्नल देण्यात आला. तुतारी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदारांना एनडीएमध्ये यायचं असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाकडून यावं, असा सल्ला भाजप हायकमांडने एकनाथ शिंदे यांना दिला.
ठाकरे-पवारांचे 6-6 खासदार शिंदेंच्या गळाला?
तुतारीचे 6 खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्याची एकनाथ शिंदेची तयारी होती. सध्या शिवसेना शिंदेंकडे 7 खासदार आहेत. जर शरद पवार गटाचे 6 आणि ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंकडे आल्यास एकूण 19 खासदार शिवसेना शिंदे गटाचे होतील. त्यामुळे 19 खासदारांचा संख्याबळावर राज्यातील बार्गेनिंग पॉवर वाढवणं. तसेच 2029 च्या निवडणुकीत किमान 19 जागांवर एकनाथ शिंदे दावा करणार असल्याची रणनीती होती. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या या रणनीतीला अद्याप ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाहीय. मागील दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना भेट दिली नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.










