सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील श्री संत निळोबाराय विद्यालयातील उपशिक्षक दत्ता सोनसळे यांना ‘बी द चेंज फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपानराव घाणे यांनी दिली.
श्री संत निळोबाराय विद्यालय हे राळेगणसिद्धी येथील एक आदर्श विद्यालय म्हणून प्रसिद्ध आहे. येथे नापास मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सुमारे चारशे विद्याथ येथे निवासी राहून शिक्षण घेतात. दत्ता सोनसळे हे पवित्र पोर्टलद्वारे गुणवत्तेच्या आधारावर या विद्यालयात उपशिक्षक म्हणून रूजू झालेले आहेत. त्यांनी येथे अल्पावधीत आपल्या शैक्षणिक कामाचा ठसा उमटविला आहे. ‘बी द चेंज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने उन्हाळ्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे धडे देण्यासाठी शिक्षकांचे दहा दिवसांचे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. या प्रशिक्षण शिबिरात सुमारे सहाशेहून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यातून गुणवत्तेच्या आधारावर दहा शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
मुंबई येथे नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या समारंभात सोनसळे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अण्णासाहेब हजारे, अध्यक्ष सदाशिव मापारी, शिक्षण समितीचे अध्यक्ष संपत पोटे, संचालक रामदास उगले, निवृत्ती मापारी, प्राचार्य सोपानराव घाणे, पर्यवेक्षक रमेश गारूडकर व सहकारी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.










