दोन सेतू सहा महिन्यांसाठी बंद | १८ जणांना समज | प्रांताधिकार्यांची कारवाई
सुनिल चोभे | नगर सह्याद्री
सेतू केंद्र एकाच्या नावावर आणि चालक दुसरा, मृत व्यक्तीच्या नावावर सेतू केंद्र चालविणे, गंभीर तक्रारी आणि नागरिकांना शासकीय सेवा देताना अधिक शुल्क आकारल्याच्या तक्रारींची दखल घेत अहिल्यानगर शहरासह तालुक्यातील चार सेतू केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तसेच दोन सेतू केंद्रे सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहेत. तर १८ सेतू केेंद्रचालकांना समज देण्यात आल्याची कारवाई प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केली.
अहिल्यानगर शहरासह, तालुक्याच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या सेतू केंद, सीएससी केंद्रांमार्फत जात, उत्पन्न, रहिवासी दाखले, आधार अपडेट, पॅनकार्ड, विविध शासकीय योजनांचे अर्ज आदी सेवा दिल्या जातात. शासनाने या सेवांसाठी निश्चित शुल्क आकारण्याचे निर्देश दिलेले असताना काही केंद्रांकडून नागरिकांकडून अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रांत कार्यालयाने संबंधित केंद्रांची चौकशी केली. चौकशीत अनेक ठिकाणी शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारण्यात आल्याचे आढळून आले. काही ठिकाणी पावती न देता व्यवहार केल्याचेही स्पष्ट झाले. काही ठिकाणी सेतू केंद्र एकाच्या नावावर आणि चालक दुसराच, सेतू केंद्र नावावर असलेला व्यक्ती मृत असे गंंभीर प्रकार समोर आले. त्यामुळे चार सेतू केंद्र चालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. तर दोन सेतू केंद्र सहा महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर सीएससी केंद्रांनाही इशारा मिळाला असून शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासकीय सेवांसाठी शासनाने ठरवलेले शुल्कच आकारावे, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीेने सांगण्यात आले. दरम्यान, नागरिकांनीही सीएससी केंद्रावर सेवा घेताना शासनाने निश्चित केलेल्या शुल्काची माहिती करून घ्यावी, अधिक पैसे मागितल्यास तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
१८ सेतू केंद्रांवरील तक्रारींचे निराकरण
अहिल्यानगर शहरासह तालुक्यातील १८ सेतू केंद्रचालकांविरोधात किरकोळ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारींचे निराकारण झाले असून संबंधित तक्रारदारांनी पुन्हा आमची कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले आहे. संबंधित १८ सेतू केंद्रचालकांना समज देण्यात आली आहे. नागरिकांना सेवा पुरविताना अधिकचे पैसे आकारण्यात येऊ नये, प्रत्येक अर्जावर संबंधित अर्जदाराचाच मोबाईल क्रमांक नोंदविण्यात यावा, सेतू केंद्रावर येणार्या प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने वागावे, केंद्राच्या दर्शनी भागात सेवांचे शुल्क आणि तक्रार निवारण अधिकार्यांचे क्रमांक स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात लावण्यात यावेत, या अटी शर्तीचे उल्लंघन केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सेतू केंद्र/आपले सेवा केेंद्र यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे.










