- जाहिरात -spot_img
breaking news

पोलिस सांगून ज्येष्ठाला लुटले, जुन्या वादातून जेऊरमध्ये राडा, कृपाल आश्रमात दानपेटी फोडली, पोलिसांना टीप दिली… ड्रायव्हरवर हल्ला कुठे काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतया पोलिसांनी धुमाकूळ घातला असून, एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाईपलाईन रोडवरील अष्टविनायक कॉलनीच्या कमानीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपतराव विष्णु पंदारे (वय 84, रा. अष्टविनायक कॉलनी, पाईपलाईन रोड) हे नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. ते अष्टविनायक कॉलनीच्या कमानीजवळ आले असता, पाठीमागून दुचाकीवर दोन अनोळखी इसम आले. त्यांनी गणपतराव यांना थांबवून, आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गळ्यातील चैन आणि हातातील अंगठ्या काढून द्या, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

घाबरलेल्या गणपतराव यांनी स्वतःच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि 40 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून दिल्या. त्यानंतर त्या भामट्यांनी खोट्या अंगठ्या गणपतराव यांच्या हातात देऊन गणेश बुक एजन्सीसमोरून दुचाकीवरून पळ काढला. काही वेळाने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात गद जमली. एका नागरिकाने या घटनेची माहिती गणपतराव यांच्या मुलाला दिली. याप्रकरणी गणपतराव पंदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून त्याने पांढरा शर्ट घातला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गिरी करत आहेत.

तलवारीसह फिरणाऱ्या तरुणाला बेड्या
अहिल्यानगर: शहरातील ताठे मळा परिसरामध्ये विनापरवाना धारदार तलवार कमरेला लावून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका 24 वषय तरुणाला तोफखाना पोलिसांनी रविवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. निखिल दीपक जाधव (वय 29, रा. बोल्हेगाव गणेश चौक, अहिल्यानगर, मूळ रा. भिंगार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना एकनाथ अवसरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. ताठे मळा येथील पंपिंग स्टेशन रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाजवळ एक तरुण कमरेला तलवार लावून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, महिला पोलीस नाईक जिजाबाई खुडे व सहकाऱ्यांनी पंचांसह ताठे मळा परिसरात सापळा रचला. संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या निखिल जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे पोलिसांना तब्बल 35 इंच लांबीची धारदार तलवार मिळून आली.

हे सुद्धा वाचा :  पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; कुठे कुठे टंचाई, पहा

ड्रेनेज लाईनच्या कारणावरून वाद
अहिल्यानगर : शहरात असणाऱ्या केडगाव परिसरातील पाचगोडाऊन गावठाण येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कारणावरून दोन व्यक्तींनी एका चालकाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोमनाथ दत्तात्रय साखरे (वय 44 वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. पाचगोडाऊन, केडगाव गावठाण, कन्या शाळेच्या मागे, अहिल्यानगर) हे 6 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास परिसरात असताना हा वाद झाला. ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कारणावरून आरोपी कैलास शेंदुरकर आणि महेश कैलास शेंदूरकर (दोघे रा. पाचगोडाऊन, केडगाव गावठाण, अहिल्यानगर) यांनी फिर्यादी साखरे यांना गाठून जुन्या कारणावरून अलील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्यानंतर आरोपी कैलास शेंदुरकर याने फिर्यादी साखरे यांच्या कपाळावर उजव्या बाजूला लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

जुन्या वादातून जेऊरमध्ये राडा
परस्परविरोधी गुन्हे दाखल | पिस्तूल दाखवून दिली जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जुन्या वादातून जेऊरमध्ये दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जेऊर बायजाबाई परिसरातील मातोश्री हॉटेल आणि एसटी स्टँड जवळ जुन्या वादातून एका चालकावर धारदार शस्त्राने आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी दीपक बाबासाहेब शिंदे (वय 29, रा. जेऊर बायजाबाई, अहिल्यानगर) हे आपल्या गाडीतून अहिल्यानगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. गावातीलच संशयित आरोपी मनोज कोथंबिरे, त्याचा पुतण्या तेजस कोथंबिरे आणि इतर तीन अनोळखी साथीदारांनी फिर्यादीची गाडी रस्त्यात अडवली. यानंतर सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. धारदार शस्त्राने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर गंभीर वार केले. या दरम्यान तेजस कोथंबिरे याने आणलेले पिस्तूलसारखे हत्यार मनोज कोथंबिरेच्या हातात दिले. मनोजने हातात शस्त्र घेऊन फिर्यादीचा पाठलाग केला आणि जीवे मारण्याची थेट धमकी दिली. फिर्यादीने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमीला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाचही जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला.दुसऱ्या घटनेत मनोज विकास कोथंबिरे (वय 40, रा. जेऊर बायजाबाई कोथंबिरे वस्ती) हे हॉटेल मातोश्री येथे बसलेले होते. त्यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी दीपक बाबासाहेब शिंदे, नितीन उर्फ पप्पू बाबासाहेब शिंदे, मयूर बाबासाहेब शिंदे, दिगंबर ससे आणि महेश उर्फ भैय्या अंबादास पवार (सर्व रा. जेऊर बायजाबाई) यांनी त्यांना गाठले. आरोपींनी कोथंबिरे यांना आधी दमदाटी केली. त्यानंतर दीपक शिंदे याने कोथंबिरे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची साखळी बळजबरीने ओढून घेतली.इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने कोथंबिरे यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी कोथंबिरे यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी खेडकर करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  श्रीगोंद्यात महाविद्यालयीन तरुणीसमोर तरुणाची आत्महत्या; शहरात खळबळ

पोलिसांना खबरी देता म्हणत ड्रायव्हरवर प्राणघातक हल्ला
तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पोलीसांना खबरी देतो आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 29 वषय ड्रायव्हरवर लोखंडी रॉड आणि धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साजिद ताहेर शेख (वय 29, रा. घासगल्ली, कोटला) हा तरुण दि. 7 जून रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास सलीम भंगारवाला यांच्या दुकानासमोर आला होता. त्यावेळी तिथे मस्तान चौक भागातील इसफान इकबाल शेख, अमीर सलीम शेख आणि पप्पू उर्फ खोजा शेख हे तिघे जण आले. तू पोलीसांना आमच्या बातम्या का देतोस? अशी विचारणा करत त्यांनी साजिद याला वाद घालण्यास सुरुवात केली. साजिदने आपण खबरी देत नसल्याचे सांगितले, मात्र आरोपींनी त्याचे काहीही ऐकले नाही.

यानंतर आरोपी इसफान शेख याने हातातील लोखंडी रॉडने साजिदच्या जबड्यावर, कमऱ्यावर आणि दोन्ही गुडघ्यांवर जबर मारहाण केली. त्याच वेळी दुसरा आरोपी अमीर शेख याने धारदार हत्याराने साजिदच्या उजव्या हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. तिसरा आरोपी पप्पू उर्फ खोजा शेख याने साजिदला लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण केली आणि याच्या बापाने मला मारले आहे, याला जिवंत मारून टाका अशी धमकी दिली. या हल्ल्‌‍यानंतर जखमी साजिद शेख याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुद्धीवर आल्यानंतर साजिदने पोलिसांकडे आरोपी इसफान शेख, अमीर शेख आणि पप्पू शेख यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार चव्हाण आणि गंगावणे करत आहेत.

कृपाल आश्रमात चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील मिस्किन नगर भागात असलेल्या कृपाल आश्रम आध्यात्मिक संस्थेमध्ये अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने आश्रमाच्या दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आश्रमातील लाकडी दानपेटी फोडून त्यामधील 17,300 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी आश्रमाचे सचिव सुशिल रामलाल बजाज यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

हे सुद्धा वाचा :  स्वतःचीच स्कॉर्पिओ चोरीला गेल्याचा बनाव; इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा कट उघड, तक्रारदारच निघाला कटाचा सूत्रधार! पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, सुशिल बजाज आणि राकेश शिवकुमार छाबरिया यांनी घटनेच्या आदल्या रात्री दानपेटीतील रक्कम तपासून ती पुन्हा पेट्यात सुरक्षित ठेवली होती. त्यानंतर आश्रम व्यवस्थित बंद करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे कमलेश छाबरिया हे आश्रम उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दरवाजाचे कुलूप आणि कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती सुशिल बजाज यांना दिली. सर्वांनी आत जाऊन पाहिले असता दानपेटी फुटलेली होती आणि त्यातील सर्व रोकड गायब होती.

आश्रमातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले असता, रात्री पावणेतीन ते तीन वाजेच्या सुमारास एक अनोळखी चोरटा आश्रमात शिरल्याचे आणि चोरी करताना स्पष्टपणे दिसून आले. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे आणि महिला पोलीस अंमलदार अनिता मरभळ करत आहेत. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ