- जाहिरात -spot_img
breaking news

शहरात रमजान ईद उत्साहात साजरी; धार्मिक एकात्मता, शांतता व देशाच्या समृद्धीसाठी विशेष प्रार्थना

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) शनिवारी (दि. 21 मार्च) मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. रमजान महिन्यातील तीस दिवसांच्या रोजा (उपवास) पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी ईद साजरी करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कोठला येथील ईदगाह मैदानावर सकाळी 10 वाजता सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण झाले. नमाजसाठी शहरातील विविध भागांमधून मुस्लिम बांधव अबालवृद्धांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो भाविकांनी एकत्र येऊन नमाज अदा केल्याने ईदगाह मैदान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

याशिवाय शहरातील विविध मशिदींमध्येही सकाळी 7 वाजल्यापासून ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मशिदींमध्ये भाविकांनी उत्साहाने नमाज अदा केली. सामुदायिक नमाजनंतर धार्मिक एकात्मता, शांतता आणि देशाच्या प्रगतीसाठी अल्लाहच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली.

ईदचा सण शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदानासह शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला परिसरातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

नमाजनंतर अनेक भाविकांनी शहरातील विविध कब्रस्तान आणि दर्ग्यांना भेट देऊन दर्शन घेतले. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले, बिर्याणी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा बेत करण्यात आला होता. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकमेकांच्या भेटीगाठी घेत सणाचा आनंद लुटत होते.
नुकताच झालेला गुढी पाडवा आणि त्यानंतर झालेल्या ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सणांचा उत्साह अधिकच वाढलेला दिसून आला. दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाजातील नागरिकांनीही एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने शहरात सामाजिक सलोखा आणि एकतेचे चित्र पाहायला मिळाले.

हे सुद्धा वाचा :  स्वकीयांकडून घेरले तरीही पुरून उरलेले गेमचेंजर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ