पारनेरमध्ये १ जून रोजी रास्ता रोको आंदोलन
पारनेर/नगर सह्याद्री :
पारनेर तालुक्यात वाढत्या अवैध घुसखोरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून, वडझिरे गावात या विरोधात जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. परिसरातील वाढती रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची संख्या तसेच बांगलादेशी जिहादी वृत्तीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने सोमवार १ जून रोजी सकाळी १० वाजता पारनेर-बेल्हे -आळेफाटा रोडवरील देवीभोयरे फाटा येथे रास्ता रोको’आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रशासनाने तातडीने या घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनाला बळ देण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी हिंदुत्ववादी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि धर्मरक्षक सागर बेग हे मान्यवर विशेष उपस्थित राहणार आहेत. ‘अवैध घुसखोरीच्या विरोधात सकल हिंदू समाज मैदानात’ अशा घोषणा देत हे आंदोलन अत्यंत आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट इशारा देण्यात येणार असून, वाढती घुसखोरी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली न गेल्यास जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला असून, आंदोलनाची मोठी तयारी सकल हिंदू समाज, पारनेर तालुक्याकडून करण्यात आली आहे.










