उबाठा शिवसेना महानगरप्रमुख किरण काळे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहरामध्ये काही समाजकंटकांना आपल्या स्वार्थासाठी दंगल घडवून आणायची आहे. नगरकरांना दंगल नको शांतता हवी आहे. माळीवाडा गोमांस प्रकरणातील भोसले नामक आरोपी महिलेला अटक करून धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलीस दलाचे विशेष कौतुक आम्ही करतो. मात्र पोलिसांनी आता पूर्ण सत्य समोर आणण्यासाठी खऱ्या मास्टर माईंडचा छडा लावावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली.
बकरी ईदच्या रात्री माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीत गोमांस टाकल्याचा प्रकार उघड झाला होता. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे पोलिसांनी तांत्रिक विलेषण केले. पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांचा सन्मान ठाकरे शिवसेना, रिपाई गवई गट व नगरकरांच्या वतीने भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका देऊन करण्यात आला. यावेळी रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संजय झिंजे, मनोज गुंदेचा, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, राम वाणी, चंद्रकांत उजागरे, राम झिने, उषा भगत, शारदा वाघमारे, मीना रणशूर उपस्थित होते.
गंगा उद्यान प्रकरणाचा छडा लावा
गंगा उद्यान नमाज पठण प्रकरणाचा देखील सखोल तपास पोलिसांनी करावा. भारतीय मुस्लिम काब्याकडे, सूर्यास्ताच्या दिशेने तोंड करून नमाज पठण करतात. मात्र गंगा उद्यान प्रकरणात उत्तर दिशेकडे तोंड करून नमाज पठण केल्याचे समोर आले आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांचे यामागे षडयंत्र आहे का ? याचा लवकरात लवकर पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी यावेळी किरण काळे यांनी केली.










