ओढे, नाले दुथडी भरून वाहु लागले
राजूर | नगर सह्याद्री
भंडारदरा परिसरात पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाऊस आणि सोसाट्याचा वारे यामुळे संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत हरवून गेला आहे. उडदावण्याच्या नदीला पूर आल्याने शिंगणवाडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर डोंगरदऱ्यातून ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत.
घाटमाथ्यावर सोसाट्याचा वारा सुटला असून या वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर काटा आणत आहेत. परिसरांमध्ये प्रचंड गारवा पसरला आहे. जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या घाटघर येथे विक्रमी 305 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर शेजारच्या रतनवाडी येथे 248 मीमी, पांजरे 176 मीमी, भंडारदरा 175 मीमी पावसाची झाल्याची नोंद आहे. वाकी परिसरातही दिवसभर धो-धो पाऊस सुरू आहे. गावाकडे जाणारे पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने आदेश दिला असून अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 9219 दलघफु झाला असून भंडारदरा धरण 83.51 टक्के भरले आहे.
अद्यापही भंडारदरा धरणाच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. कळसुबाई शिखरावर ही प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत असून वाकी धरण पूर्णपणे ओसंडून वाहत असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत आहे. निळवंडे धरण सकाळी सहा वाजता 42.50. टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा 3542 दलघफु झाला आहे.दरम्यान, एकीकडे पूरस्थिती असली तरी दुसरीकडे बळीराजासाठी हा पाऊस वरदान ठरत आहे. अकोले तालुक्यातील भात खाचरं पाण्याने तुडुंब भरली आहेत. महिनाभरापूव पाण्याअभावी चिंतेत असलेला शेतकरी आता भात लागवडीच्या कामात व्यस्त झाला आहे. या पावसामुळे भंडारदरा धरणात पाण्याची मोठी आवक सुरू झाली असून धरणाचा साठा 85 टक्के झाला आहे.
जिल्ह्यास अतिवृष्टीचा येलो अलर्ट
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रातील पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये आज दुपारी १२.०० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमा नदीत दौंड पुलाजवळ २७ हजार ६५१ क्युसेक, घोड धरणातून घोड नदीत ४ हजार क्युसेक आणि गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार ७७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा, घोड व गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे प्रवरा व मुळा नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
मेघगर्जना व विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली अथवा झाडांजवळ उभे राहू नये. तसेच मोकळी मैदाने, टॉवर, ध्वजांचे खांब, विद्युतवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण आणि रोहित्रांपासून दूर राहावे. वादळी वाऱ्यादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल आदींपासून सुरक्षित अंतर राखावे. मोकळ्या जागेत अडकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान व डोके झाकावे आणि जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आजूबाजूला थांबणे टाळावे.
पर्यटकांनी धरणे, नद्या व ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी छायाचित्रे (सेल्फी) काढणे टाळावे. नदी, ओढे व नाल्यांवरील पूल अथवा बंधारे पाण्याखाली गेले असल्यास ते ओलांडू नयेत. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखून तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाटरस्त्यांवरील प्रवास शक्यतो टाळावा. जुनाट अथवा धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी स्वतःचे तसेच जनावरांचे संरक्षण करून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० हे दूरध्वनी क्रमांक अथवा ११२ आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी कोणत्या जिल्ह्याला पावसाचा इशारा?
राज्यात सलग काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसानंतर आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा (२३ जुलै ते २७ जुलै २०२६) जिल्हास्तरीय अंदाज आणि इशारा जारी केला आहे. २७ तारखेपर्यंत कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिलेला नाही.
राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून रेड अलर्ट पूर्णपणे हटवण्यात आला आहे. मात्र, धोका अद्याप टळलेला नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शुक्रवारी राज्यातील पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पालघर, नाशिक घाट, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागात पावसाचा जोर काहीसा कमी होऊन ‘यलो अलर्ट’ राहील. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी कुठल्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.
शनिवारी २५ जुलै रोजी पावसाचा जोर आणखी कमी होणार असून या दिवशी राज्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट पूर्णपणे निरंक राहतील. २५ जुलैला केवळ रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट या भागांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाची तीव्र तीव्रता कमी झालेली पाहायला मिळेल.
त्यानंतर २६ जुलै (रविवार) आणि २७ जुलै (सोमवार) रोजी हवामानात अधिक सुधारणा होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही दिवशी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. या कालावधीत केवळ पुणे घाट परिसरात यलो अलर्ट राहील, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये ‘ग्रीन अलर्ट’ राहण्याची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे विकेंडनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.










