नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध भडकले असताना आता इराणच्या अध्यक्षांनी मोठे पाऊल उचलले आहे. आठ दिवसांपासून पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ल्याचे सत्र सुरू होते. शनिवारी इराणने शेजारी असलेल्या मुस्लीम राष्ट्रांची माफी मागत क्षेपणास्त्र हल्ले थांबवत असल्याची घोषणा केली. इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी टीव्हीवर केलेल्या भाषणात म्हटले की, इराणच्या तात्पुरत्या नेतृत्व परिषदेने शेजारील देशांवरील हल्ले आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत इतर देशातून हल्ले होणार नाहीत, तोपर्यंत इराणही हल्ले करणार नाही.
अमेरिका-इस्रायलला दिला इशारा
इराणच्या नरमाईच्या भूमिकेमुळे आता या युद्धातून मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या भाषणात डॉ. मसूद पेझेश्कियान म्हणाले, मी शेजारच्या देशांची माफी मागतो. इतर देशांवर आक्रमण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. तथापि अमेरिका आणि इस्रायलसमोर शरणागती पत्करणार नाही, असेही पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले आहे. “इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, अशी इच्छा शत्रूंनी व्यक्त केली आहे. त्यांची इच्छा त्यांच्याबरोबरच त्यांच्या थडग्यात पुरली जाईल”, असेही पेझेश्कियान म्हणाले.
अमेरिका-इस्रायलला विरोध करताना आखाती देशांत हल्ले
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर युद्धाला सुरुवात होताच इराणनेही प्रत्युत्तरादाखल शेजारच्या आखाती देशांतील अमेरिकेच्या हवाई आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. दुबई, अबु धाबी आणि युएई सारख्या मोठ्या शहरांमध्ये क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसेच कुवैत, ओमान, कतार आणि सौदी अरेबियालाही लक्ष्य करण्यात आले.
दरम्यान अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. यानंतर इराणकडून प्रत्युत्तराची धार आणखी वाढली. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणबाबत आपली भूमिका अधिक कठोर केली. इराणने बिनशर्त शरणागती पत्करल्याशिवाय इराणशी कोणताही करार होणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.










